22 वर्षीय विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल.
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील बाळद येथे राहत्या घरात २२ वर्षीय विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. विवाहितेने आत्महत्या केली नसून तिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध मयत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील आमडदे येथील निकीता हिचा विवाह पाचोरा तालुक्यातील बाळद येथील अनिल पवार यांचेशी २३ मे २०१९ रोजी बाळद ता. पाचोरा येथे झाला होता. लग्नानंतर पती अनिल पवार व सासरच्या मंडळींकडून निकीता हिचा शारिरीक व मानसिक छळ सुरु झाला. पती अनिल पवार हे निकीता हिच्याकडे माहेरहुन बॅण्ड घेण्यासाठी ५० हजार रुपये घेवुन ये अशी मागणी करत निकीता हिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होते. मात्र निकीता हिच्या माहेरची परिस्थिती हालाकीची असल्याने निकीता होणारा त्रास सहन करत राहीली. अखेर ११ एप्रिल रोजी राहत्या घरात निकीता पवार (वय – २२) या विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. मात्र निकीता हिने आत्महत्या केली नसुन तिला आत्महत्या करण्यास पतीसह सासरच्या मंडळींनी प्रवृत्त केल्यानेच निकीता हिने आपले जीवन संपविल्याचा आरोप मयत निकीता हिच्या भावाने केल्याने निकीता हिचा भाऊ विनोद बोरसे रा. आमडदे ता. भडगाव यांच्या फिर्यादीवरून मयत निकीता हिचे पती अनिल पवार, बापु पवार, सासरे, सासु, व जेठ सर्व रा. बाळद ता. पाचोरा यांचे विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.