मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रात्री अडीच वाजता सलाईन लावली
जालना-
मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी 8 जून शनिवार रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत असणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र,मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे बुधवारी पहाटे अडीच वाजता मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी आग्रह धरण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आणि डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली. तेव्हा मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी राजी झाले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांना तीन सलाईन लावण्यात आल्या. अंबडचे जिल्हाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी मंगळवारी दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपचार करुन घेण्याची विनंती केली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचे अपडेट्स सरकारला कळवले होते. राज्य सरकारकडून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर लक्ष ठेवले जात आहे. अद्याप राज्य सरकारकडून कोणालाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला पाठवण्यात आलेले नाही. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती वेगाने खालावत असल्याने राज्य सरकार त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहावे लागेल.
मनोज जरांगेंचं ब्लड प्रेशर कमी
जालन्याच्या आरोग्य जिल्हाधिकारी जयश्री भुसारे यांच्या नेतृत्त्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. यानंतर डॉ. जयश्री भुसारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, मनोज जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला आहे. उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना शक्य तितक्या लवकर उपचारांची गरज असल्याचे डॉ. जयश्री भुसारे यांनी सांगितले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. एका बाजूला आमच्याशी चर्चा सुरु आहेत दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. अद्याप दोन ते तीन दिवसांत कुठलाही संवाद सरकारतर्फे झालेला नाही. कुणी संपर्कही केलेला नाही. माझे बेमुदत उपोषण सुरु आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, लाडीगोडी लावून बोलत आहेत. एकीकडून म्हणायाचं तातडीने मार्ग काढतो. बेमुदत उपोषण सुरु आहे तरीही पाच दिवस होऊ द्यायचे. यामागे सरकारचा डाव असू शकतो, असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते.