मुंबई-
मुंबईतील मालाड भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरनं खाण्यासाठी आईस्क्रीम ऑर्डर केली होती. मात्र, आईस्क्रीम खाताना त्यात चक्क माणसाचं बोटचं आढळुन आले. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मालाड मध्ये एका MBBS डॉक्टर ने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क माणसाच्या बोटाचा तुकडा सापडला. याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यम्मो आईस्क्रीम कंपनी विरोधात भारतीय दंड संविधान कलम 272 ,273 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट फॉरेन्सिक ला पाठवल्याची माहिती मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी दिली आहे.
मालाड येथील रहिवाशी असलेल्या ओर्लेम ब्रेन्डन सेराओ या डॉक्टरने ऑनलाईन डिलिव्हरी ॲपवरून बटर स्कॉच आईस्क्रीमचा कोन मागवला होता. आईस्क्रीम खाताना तोंडात साधारण दोन सेंटिमीटर लांब बोटाचा अवशेष आला. एमबीबीएस डॉक्टर असलेल्या ओर्लेमला हा अवशेष मानवी बोट असल्याचा संशय आला. त्यानं याबाबत मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आता मालाड पोलीस ऑनलाईन डिलिव्हरी ॲप तसेच आईस्क्रीम उत्पादकांची चौकशी करणार आहेत. यम्मो आईस्क्रीम कंपनीच्या आईस्क्रीमची देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार असून आईस्क्रीम कंपनीची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तक्रारदाराची प्रतिक्रिया
मी तीन आईस्क्रीमचे कोन ऑर्डर केले होते. त्यातील एक बटर स्कॉच आईस्क्रीम होती. आईस्क्रीम खात असताना तोंडात एक तुकडा आला. अगोदर मला वाटलं की तो आईस्क्रीमचाच काही घटक असेल. मात्र, जेव्हा मी तो तुकडा नीट बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा मांसाचा तुकडा आहे आणि त्याला नख देखील आहे. त्यामुळे मला तो मानवी बोट असल्याचा संशय आला. हे बघून मी फार घाबरलो. त्यानंतर पोलिसांना पुरावा दाखविण्यासाठी मी तो तुकडा बर्फात ठेवला- डॉ. ओर्लेम ब्रेन्डन सेराओ,
मालाड पोलिसांची प्रतिक्रिया
आईस्क्रीममध्ये बोट सापडण्याचा प्रकार संशयास्पद खून नसल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे. कामगाराच्या बोटाला जखम झाल्यानंतर ते बोट मशिनमधील आईस्क्रीमध्ये पडलं असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तर आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आल्याबाबत माहिती दिली.