“हिट अँन्ड रन”घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ट्विट
मुंबई-
गेल्या काही महिन्यांत एकामागोमाग एक असे दारुच्या नशेत अपघात करण्याचे आणि पळून जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने आरोपी सापडतात परंतू ग्रामीण भागात कोण ठोकून गेला हे आकाश पाताळ एक केले तरी कळत नाही. पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा बिल्डर बाळाचा प्रताप समोर असतानाच नुकताच मुंबई आणि पुण्यात दोन अपघात घडले आहेत. या काळातही अनेक अशाप्रकारचे अपघात झालेले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर भुमिका घेण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले आहे.
महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मी अत्यंत चिंतेत आहे. शक्तिशाली आणि प्रभावशाली लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून अपघाताच्या घटनांमध्ये फेरफार करतात हे असाह्य आहे. माझ्या सरकारकडून न्यायाचा असा गर्भपात सहन केला जाणार नाही, असे ट्विट शिंदे यांनी केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे प्राण आपल्यासाठी अनमोल आहेत. ही प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि न्याय मिळावा याची खात्री करण्यासाठी मी राज्य पोलीस विभागाला निर्देश दिले आहेत. याव्यतिरिक्त, आम्ही कठोर कायदे आणि हिट अँड-रन गुन्हेगारांसाठी कठोर दंडांची अंमलबजावणी करत आहोत, असेही शिंदे म्हणाले.
मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग तो श्रीमंत असो, किती तो प्रभावशाली असो, किंवा नोकरशहा किंवा मंत्रीपूत्र असो , कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला गुन्ह्यातून सुटण्यासाठी ताकद मिळणार नाही. अन्याय मुळीच खपवून घेतला जाणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला आहे.
मुंबई आणि पुण्यात दोन गंभीर अपघात झाले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने दारुच्या नशेत दुचाकीस्वार दाम्पत्याला उडविले आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात दापोडी येथे खडकी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना कारचालकाने दारुच्या नशेत उडविले आहे. यात एका पोलीस कर्माचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. महिनाभरापूर्वी बिल्डर बाळाने काही वाहनांना उडवत दोघांचा जीव घेतला होता. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी आमदारापासून ससून हॉस्पिटलपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते.