कायदा सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी- पालकमंत्री दादा भुसे..
नाशिक-
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.नाशिक जिल्ह्यात दि. 16 ऑगस्ट रोजी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (शहर) संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली.
जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने समन्वयाने जिल्ह्यात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती संयमाने व संवेदनशीलतेने हाताळल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, 16 ऑगस्ट रोजी नाशिक शहर येथे उद्भवलेल्या परिस्थितीवर नाशिक शहर पोलिसांनी वेळीच कार्यवाही करून शान्तता प्रस्थापित केली आहे. परिस्थिती शांत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिले.