नागपूर-
अल्पवयीन मुलीला पैशांचे आमीष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. यातील एक आरोपी फरार असून हुडकेश्वर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शुभांगी योगिराज नागोसे (वय ३५) रा. सर्वश्रीनगर असे देहव्यापार चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर भुपेंद्र दुबे (वय ३०) रा. इतवारी असे तिच्या साथीदाराचे नाव आहे. आरोपी महिला मुलींना पैशांचे आमीष दाखवून त्यांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करीत होती. मुलींना ग्राहक आणि जागा उपलब्ध करून देऊन ती देहव्यापार चालवित होती. याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून धाड टाकली. तेथे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीकडून आरोपी महिला देहव्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी आरोपी महिलेस अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली. आरोपी महिला आणि मुलीला हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील आरोपी भुपेंद्र दुबे हा फरार झाला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध कलम ३, ४, ५, ७, पिटा अॅक्ट सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायदा सहकलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.