झेरॉक्स दुकानदाराने,दुकानीतच गळफास घेत संपवली जीवनयात्रा..
पाचोरा-
पाचोरा शहरातील पोलिस स्टेशन परीसरातील एका झेरॉक्स दुकानदार व्यावसायिकाने दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज रविवारी रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परभतसिंग केसरसिंग राजपुत (वय ५२, रा. पांडवनगरी, पाचोरा) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांचे पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पाचोरा पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर परभतसिंग यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. झेरॉक्स व तहसिल, प्रांत कार्यालयास लागणारे अर्ज विक्री करुन आपला व परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. आज रविवारी दिनांक ८ सप्टेंबर रोजी सुट्टीचा दिवस असल्याने परभतसिंग राजपुत हे सकाळी ८ वाजता घरुन निघाले ते दुकानाकडे जात असताना दरम्यान परभतसिंग राजपुत यांना रस्त्यात काही मित्रही भेटले. मित्रांसोबत गप्पा मारल्या नंतर 8:30 वाजेच्या सुमारास परभतसिंग राजपुत हे दुकान उघडुन दुकानात गेले.
दरम्यान काहीच वेळात ते दुकानात नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. (केसीएन) मयत परभतसिंग यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहे. अत्यंत हसमुख व शांत स्वभावाचे परभतसिंग राजपुत यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.