भडगाव तालुक्यात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा.शेतकरी संघटना..
भडगाव-
भडगाव तालुक्यात दोन महिन्यापासून अतिवृष्टी सारखा पाऊस बरसत असून, गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेलेला आहे. कापूस, मक्का, ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, तरी भडगाव तालुक्यात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा यासंबंधीचे निवेदन शेतकरी संघटनेने भडगाव नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे यांना आज रोजी दिले. चालू खरीप हंगाम बरा येईल अशी आशा होती,तसेच मागील वर्षा सारख्या दुष्काळाच्या झळा आता बसणार नाहीत या आशेने शेतकऱ्यांनी शेतात बऱ्यापैकी खर्च केला आणि ऐन शेतीचा माल आता घरात येईल व कापसाला भाव मिळेल हे साल चांगले जाईल या आशेवर असतानाच ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या परतीच्या पावसाने बिचाऱ्या बळीराजाच्या हातात आलेल्या मालाचे डोळ्यात देखत लाखोंचे नुकसान झाले आहे. कापूस, मका, तूर, सोयाबीन, ज्वारी बाजरी ही पिके हातची गेली आहेत. त्यासाठीच शेतकरी संघटनेने आज रोजी तहसीलदार भडगाव यांना निवेदन देऊन सरसकट पंचनामे करून भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपये अनुदान जाहीर करावी यासंबंधीची मागणी केली.याप्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अखिलेश पाटील, वाल्मीक लोखंडे, सरदार सिंग पाटील, लक्ष्मण बोरसे, भिला महाजन, भगवान महाजन, अक्षय पाटील, अशोक परदेशी, अमोल पाटील, घनश्याम पाटील इत्यादी उपस्थित होते.