कुटुंब व्यवस्था विस्कळीत होवू देवू नका-जयसिंग वाघ
जळगाव-
शिक्षण , नोकरी , व्यवसाय या व अन्य कारणांनी संयुक्त कुटुंब व्यवस्था आता संपल्यात जमा आहे , विभक्त कुटुंब व्यवस्थेतही आई , वडील , भाऊ , बहीण वेगवेगळ्या गावी राहत असून विशिष्ट दिवशी ते विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात असे आजचे चित्र असल्याने त्यातच जोडीदारा विषयी वाढत असलेल्या अपेक्षा यामुळे मुला मुलींचे विवाह लवकर जुळत नाही . सामाजिक , कौटुंबिक भान राहत नाही. तेंव्हा नियोजित वधू , वर यांनी फार अटी , शर्ती न बाळगता विवाह करावा , कौटुंबिक जिव्हाळा ठेवावा व विस्कळीत होत असलेली कुटुंब व्यवस्था विस्कळीत होणार नाही याचे भान ठेवावे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.जळगाव येथील सैनिक सभागृहात आयोजित बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. राजेश झाल्टये यांनी सांगितले की वधू , वर परिचय मेळावे घेणे , सामूहिक विवाह लावणे आज काळाची गरज आहे . मुला मुलींनी सामाजिक भान ठेऊन तसेच कौटुंबिक जबाबदारी ओळखून जबाबदार घटक म्हणून जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे .
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चंद्रगुप्त सुरवाडे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की , आज अनुरूप जोडीदार मिळणे दूर राहिले आहे तर वधूच मिळणे कठीण झाले आहे . पर राज्यातील , पर जातीतील मुलगी मिळाली तरी चालेल असे सांगितले जाते.या गोष्टीचा गैरफायदा अनेक लोक घेवून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहेत .
वीर सावरकर रिक्षा युनियन चे अध्यक्ष दिलीप सपकाळे , ॲड. रेखा कोचुरे , ॲड. दिलीप भुरे यांचीही समायोचीत भाषणे झालीत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभारप्रदर्शन अशोक तायडे यांनी केले.
सुरुवातीस जयसिंग वाघ यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता चंदा सुरवाडे , सविता तायडे , बाबुलाल सोनवणे, किर्ती साबळे , उषाबाई सोनवणे , कोमल गुरचळ, उज्वला सोनवणे, प्रतीक्षा साबळे , विजय गुराचळ, मनीष साबळे , राहुल सोनवणे, मिलिंद साबळे यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्यात १२५ मुला , मुलींनी परिचय करून दिला. मेळाव्यास जिल्हाभरातून लोक मोठ्यासंख्येने आले होते . मेळाव्यात अनेकांनी नोंदणी केली .