“डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव – समाजाच्या वर्गणीतील विश्वासातून उभारलेला वैचारिक सोहळा!”

पाचोरा-
“स्वतःला कमी समजू नका, शिकून पुढे जा आणि समाज घडवा” हे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनसूत्र
वर्षानुवर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन युवा फाउंडेशन यांच्या वतीने पाचोरा शहरात नवचैतन्याने पसरवले जात आहे. त्याच प्रेरणेने, यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पाचोऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन युवा फाउंडेशन यांच्या वतीने एक आगळावेगळा, प्रेरणादायी आणि समतेचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव १३ आणि १४ एप्रिल २०२५ रोजी दरवर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार असून, केवळ आंबेडकरी समाजाच्या वर्गणीच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे.

ही बाब समाजासाठी अभिमानास्पद आणि आत्मसन्मान जागवणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा ठेवा समाजापर्यंत पोहचवण्याच्या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा शहरात हा उत्सव केवळ जयंती म्हणून नव्हे तर विचार महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. ‘परिवर्तन युवा फाउंडेशन’च्या माध्यमातून नव्या पिढीला इतिहासाची जाणीव आणि भविष्याच्या दिशेने वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो. यंदाचा जयंती महोत्सव खास ठरणार आहे, कारण या वर्षीच्या विशेष आकर्षणांमध्ये – आर्या ट्रस्ट सेटअप, धुळे आणि शक्ती डीजे, धुळे या दोन भव्य व दर्जेदार आयोजनांची भर पडत असून, संगीत आणि प्रकाशाच्या झगमगाटात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वातावरण तयार करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीभोवती विशेष विद्युत रोषणाई, सुसज्ज मंच व्यवस्था, व्हिडिओ व ध्वनी प्रणाली नियोजित आहे. या महोत्सवात सामील होणारे परिसर – नागसेन नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भारतीय नगर, निळा चौक, राजा मिलिंद नगर, संत गाडगेबाबा नगर, सम्राट अशोक नगर, मिलिंद हौसिंग सोसायटी, जनता वसाहत, भीम नगर, मित्रा टाईप, शाहू नगर, महात्मा फुले नगर, आन्ना भाऊ साठे नगर व संपूर्ण पाचोरा तालुका व शहरातील आंबेडकरी समाज – ही सर्व वस्ती, नगर, विभाग एकत्र येऊन ‘एक समाज, एक विचार, एक ध्येय – समता, बंधुता आणि न्याय’ या तत्त्वांचा भव्य दर्शन सोहळा घडवणार आहेत. या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे – कोणत्याही राजकीय किंवा बाह्य आर्थिक मदतीविना, फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजातील नागरिकांच्या वर्गणीच्या माध्यमातून हा संपूर्ण उत्सव उभारण्यात येतो. या वर्गणीचे संकलन अत्यंत पारदर्शक पद्धतीने केले जाते आणि त्यातूनच व्यासपीठ, विद्युत सजावट, ध्वनी प्रणाली, साउंड सिस्टम, जनजागृतीसाठी साहित्य, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, व स्वच्छता यासारख्या आवश्यक बाबींची व्यवस्था करण्यात येते. या उत्सवामागे असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन युवा फाउंडेशन, पाचोरा ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीच्या मूलभूत विचारसरणीशी निष्ठा ठेवत, सामाजिक प्रबोधन, युवकांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवणे, आणि आंबेडकरांच्या विचारांची मुळे नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचे काम करत आहे. या वर्षी देखील १३ एप्रिल रोजी सायंकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ दीपप्रज्वलन, ‘जयभीम’ घोषणांनी गगन भरून टाकणारी शोभायात्रा, तरुणांची घोषणा मिरवणूक, विशेष सजावटीचे देखावे, समाजप्रबोधनपर घोषणा, झांजपथकांचे वादन, डीजेवरील वैचारिक गाणी आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, विचारधारा प्रसारित करणारे सामाजिकदृष्ट्या जागर कार्यक्रम हे केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ नाही, तर ते वैचारिक शिस्त, सामाजिक एकात्मता आणि नवसंघटनाचे अधिष्ठान आहे. या आयोजनात सहभागी असलेल्या प्रत्येक नगरातील कार्यकर्त्यांनी आपली भूमिका अत्यंत निष्ठेने निभावली आहे. महिला मंडळ, विद्यार्थी, युवक कार्यकर्ते, सांस्कृतिक मंडळे, वाद्यवृंद संघटना यांचा सहभाग विशेषत्वाने उल्लेखनीय आहे. जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तके, छायाचित्रे, चित्रफीती यांचे स्टॉल उभारण्यात आले आहे. ‘ या उत्सवामध्ये भारतीय संविधानाचा अभिमान जागवला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान, त्याचे मूल्य, त्यात दिलेल्या मूलभूत हक्कांचे महत्त्व समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवले जाईल. विविध घोषणा, पोस्टर्स, बॅनर्स आणि प्रबोधनपर साहित्याद्वारे संविधानाचे भान जपले जाणार आहे. पाचोरा शहरातील सर्व वस्ती, नगर, आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्सवात सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे. यातून समाजामध्ये असलेली एकजूट, परस्पर सहकार्य आणि अभिमान यांचे दर्शन घडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार म्हणजे फक्त दलितांचा नव्हे, तर सर्व मानवतेसाठीचा मार्ग आहे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पाचोरा शहरात ‘परिवर्तन युवा फाउंडेशन’च्या नेतृत्वात घडणारा हा समतेचा, बंधुतेचा आणि संविधाननिष्ठतेचा उत्सव निश्चितच समाजासाठी नव्या उंचीचा संदेश देणारा ठरेल. आपल्या वर्गणीच्या माध्यमातून एक ऐतिहासिक आणि सशक्त आयोजन साकार करणाऱ्या या फाउंडेशनचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. पाचोरा शहरातील हा उत्सव म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातली ‘नवभारत निर्मिती’ प्रत्यक्षात अनुभवण्याचा क्षण ठरणार आहे.




