पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला अवैध धंदे बंद करण्याचा तक्रारी देवून हि कारवाई नाही,अंबे वडगाव ग्रामपंचायतीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना केली अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी..

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे सट्टा मटका, जुगार तसेच अवैध दारू निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून, या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत आंबे वडगाव यांच्यावतीने वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रारी अर्ज देवुन करण्यात आली आहे.अंबे वडगाव, कोकडी व वडगाव जोगे या गावांचा समावेश असलेल्या गट ग्रामपंचायतीच्या हद्दीत सध्या अवैध सट्टा मटका, जुगार व दारू निर्मिती-विक्री खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बेकायदेशीर कृत्यांमुळे गावातील अल्पवयीन मुले, तरुण तसेच काही जेष्ठ नागरिक व्यसनाधीन होत असून, त्याचा परिणाम गावातील कुटुंब व्यवस्थेवर होत असून व्यसनाधीन व्यक्तींकडून महिलांच्या अंगावरील दागिने, घरातील संसारोपयोगी वस्तू तसेच धान्य विक्री करून व्यसनाची पूर्तता केली जात असल्याने अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिक संकटात सापडली आहेत. परिणामी महिलांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने यापूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी देण्यात आल्या असून ग्रामस्थांच्या ठरावाची प्रतही सादर करण्यात आली होती. मात्र, या तक्रारींनंतरही संबंधित अवैध धंद्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. त्यामुळे अखेर ग्रामपंचायतीला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे थेट तक्रार अर्ज सादर करावा लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीच्या तक्रारीत संबंधित अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच येत्या आठ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, अंबे वडगाव परिसरातील अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी जोर धरत आहे





