उत्राण येथे भागवतदादा केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचे 25 मार्च रोजी करण्यात आले आयोजन…

एरंडोल-
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक असलेल्या कासोदा जवळील उत्राण येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेकडे परिसरातील शेतकरी, बैलगाडा प्रेमी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ही स्पर्धा बुधवार दि.25 मार्च 2026 रोजी बुधवारी सकाळी 9 वाजता उत्राण (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथे रंगणार आहे. समस्त ग्रामस्थ उत्राण यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष उत्राणचे माजी सरपंच भागवतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहे. स्पर्धेसाठी प्रत्येकी २१०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. एक आदत एक बैल मैदान तसेच एक दुसा एक बैल मैदान अशा दोन गटांमध्ये शर्यती होणार असून प्रत्येक गटासाठी प्रथम ते सहावा क्रमांकापर्यंत आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
विजेत्यांना होंडा शाईन, HF डिलक्स तसेच इलेक्ट्रिक स्कूटीसारखी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय गट पाससाठीही विशेष बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेपूर्वी दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मैदानावर प्राथमिक प्रक्रिया व गट वाटप करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीचीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेचे समालोचन अनुभवी समालोचकांकडून करण्यात येणार असून गोंडा पंच व निकाली पंच यांच्या देखरेखीखाली शर्यती पार पडतील. संपूर्ण कार्यक्रम युट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार असल्याने दूरवरच्या प्रेक्षकांनाही या थराराचा आनंद घेता येणार आहे. मैदान संपर्कासाठी जुनेद पठाण, प्रेम महाजन, शरद वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडा संघटना जळगाव जिल्हा यांच्या नियमांनुसार पार पडणार असल्याने शिस्तबद्ध व सुरक्षित आयोजनाची हमी देण्यात आली आहे. परिसरातील पारंपरिक क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ही बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडणार असून हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत थरारक स्पर्धा रंगणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



