पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू..

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत
अवैध सट्टा-मटका, जुगार तसेच अवैध देशी विदेशी,गावठी दारू मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून अवैध धंद्यामुळे गरीब व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे.यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, तरुणवर्ग या अवैध धंद्यामुळे व्यसनाधीन,व कर्जबाजारीत ओढले जात आहे. तसेच समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. या गंभीर परिस्थितीकडे पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी लक्ष देवून सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये सट्टा-मटका उघडपणे सुरू असून पोलीसांची कारवाई केवळ दिखाऊ स्वरूपाची असल्याचा आरोप सुज्ञ नागरीक करीत आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे बंद करण्यासाठी “वॉश आउट”मोहीम हाती घेत काही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई केली.परंतु गेल्या दोन तीन महिन्यांपासून “वॉश आउट” मोहीम थंडावलेली दिसून येत आहे.अवैध धंदे व्यावसायिकांवर कठोर कारवाई,न करता थातुरमातुर कारवाई करुन सोडून देण्यात येते याबाबत परीसरातील नागरिकांमध्ये चर्चा होते.म्हणुन या अवैध धंदे व्यावसायिकांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला दिसून येत नाही, सुरु असलेल्या अवैध धंद्यामुळे गरीब मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे. कष्टाने मिळवलेल्या पैशांची उधळपट्टी या व्यवसायात होत असून संपूर्ण समाजव्यवस्थेवर त्याचा दुष्परिणाम होत आहे.सट्टा-मटका हा केवळ एक जुगार नसून त्यातून व्यसनाधीनता, घरगुती वाद, कुटुंबे उद्ध्वस्त होणे, चोरीसारखे गुन्हे वाढणे अशा अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत.पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी सुज्ञ नागरीकांकडून करण्यात येत आहे.



