उपोषणाच्या इशाऱ्यानंतरच पोलिसांना जाग;पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई..

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यानंतर अखेर पोलिस प्रशासनाला जाग आली आहे. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी १४ एप्रिल रोजी उपोषणाचा इशारा दिल्यानंतरच पोलिसांनी हालचाल करत अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून सट्टा, मटका, विमल गुटखा,गावठी दारू, पत्त्यांचे क्लब यांसारखे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत होती. मात्र, याकडे पोलिसांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत होता. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता कैलास तांबे व पत्रकार निलेश पाटील,चंदू खरे, कुंदन बेलदार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा यांना दिनांक 23/03/2026 रोजी निवेदन देण्यात आले होते.पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीतील सुरु असलेले सर्व अवैध बंद करण्याबाबत व 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी प्रांताधिकारी कार्यालय समोर उपोषणाचा इशारा दिला आहे .या इशाऱ्यानंतरच पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही ठिकाणी धाड टाकून अवैध धंद्यांवर कारवाई केल्याचे समोर आले आहे.मात्र, ही कारवाई केवळ दिखावा आहे का, की खरोखरच अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.पोलिस प्रशासनाने केवळ दबावाखाली नव्हे, तर नियमितपणे कठोर कारवाई करून परिसरातील बेकायदेशीर धंदे पूर्णपणे बंद करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.



