अवैध गावठी दारुच्या हातभट्ट्या केल्या नष्ट;कासोदा पोलिसांनी केली कारवाई

एरंडोल-
एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर कासोदा पोलिसांनी शनिवारी (दि. 11) पहाटे धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर रसायन, तयार दारू व साहित्य नष्ट केले.ताडे, आडगाव, निपाणे व नांदखुर्द बु. या गावांच्या शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी अड्ड्यांवर पोलिसांनी नियोजनबद्ध छापे टाकले. या कारवाईत हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे 1200 लिटर रसायन, तयार दारू तसेच साहित्य जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ₹60 हजार इतकी असून, या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अवैध दारू संदर्भात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी विशेष नियोजन करून चार पथके तयार केली होती. या पथकांनी समन्वय साधत एकाच वेळी छापे टाकून अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.या कारवाईत रामकृष्ण पाटील, नंदलाल परदेशी, किरण गाडीलोहार, अकिल मुजावर, योगेश पाटील, लहु हटकर, कुणाल देवरे व सोनू पाचुंदे यांनी सहभाग नोंदवला.



