पंडित प्रदिपजी मिश्रा यांचा शिवमहापुराण कथेमुळे लालपरीला मिळाले ७४ लाखांचे उत्पन्न.
जळगाव-
आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री पंडित प्रदीप मिश्रा यांचे श्री शिवमहापुराण कथा वडनगरी फाटा परीसरात ५ ते ११ डिसेंबर दरम्यान संपन्न झाली.
कथेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने जादा बसेस सोडत सात दिवसात तब्बल ७३ लाख ८७ हजार २३९ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
बड़े जटाधारी महादेव मंदिर परिसरातील कथेच्या सर्वच दिवस जिल्ह्यातूनच नव्हे, तर इतर राज्यातील जिल्ह्यामधुन भाविक येत होते. त्यात शेवटच्या चार दिवसात कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भाविकांची संख्या ७ ते ८ लाखांच्यादरम्यान होती.
भाविकांची ही गर्दी लक्षात घेता, जळगाव एस.टी. विभागाने विविध बसस्थानकातून थेट श्री शिवमहापुराण कथेच्या वाहनतळापर्यंत भाविकांना सोडण्यासाठी दररोज दोनशे बसगाड्यांचे नियोजन सुरुवातीला केले होते.
मात्र भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, ‘भरली की चालली” याप्रमाणे जळगाव विभागातील सर्वच आगारातून बसेस सोडण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगणोर यांनी सांगितले.
जळगाव विभागातील सर्व ११ आगारातून श्री शिवमहापुराण कथेसाठी जादा बसगाड्या सोडण्यात आल्या. ५ ते ११ डिसेंबर या सात दिवसांमध्ये विभागातून सहा हजार ६३२ बसफेऱ्या झाल्या, त्यामध्ये सर्वाधिक फेऱ्या जळगाव आगारातून एक हजार ८५० इतक्या झाल्या, सात दिवसात सुमारे साडेपाच लाखांपेक्षा अधिक भाविकांनी प्रवास केला आहे.
एकूण झालेल्या फेऱ्यांमधून बसगाड्यांचा प्रवास दोन लाख १० हजार ४४० किलोमीटर झाला आहे.
श्री शिवमहापुराण कथेसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसफेऱ्यांमधून जळगाव विभागाला मिळालेल्या एकूण उत्पन्नामध्ये सर्वाधिक उत्पन्न चोपडा आगाराने मिळविले आहे. चोपडा आगारातून ९९६ फेऱ्यांमधून १९ लाख ७१ हजार ९३० इतके उत्पन्न मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर यावल आगार राहिले असून या आगाराने १० लाख ५० हजार ८६३ इतके उत्पन्न मिळविले आहे.