शिंदाड शिवारातील सात गावठी दारुच्या भट्ट्या केल्या उध्वस्त; पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी.
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावालगतच्या शिवारात काही लोक मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीच्या दारुची अवैध निर्मिती व विक्री करत होते. तसेच मोठ्या प्रमाणात दारु तयार करून वरखेडी, वडगाव आंबे, पिंपळगाव हरेश्वर व इतर गावांना मोठ्या प्रमाणात दारु घरपोच पाठवत होते. यामुळे शिंदाड येथील गावठी दारुची निर्मिती व विक्री आसपासच्या दहा खेड्यापाड्यातील लोकांची डोकेदुखी ठरत होती.
या बाबत गुप्त माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना मिळाल्यावर त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, अमोल पाटील, उज्वल जाधव, अभिजित निकम यांना शिंदाड शिवारात दिनांक २२ एप्रिल सोमवार रोजी 7 गावठी हातभट्ट्याची तोडफोड करत गावठी दारुच्या निर्मितीसाठी लागणारे हजारों रुपयांचे कच्चे, पक्के रसायन, प्लॅस्टिक टाक्या व इतर साहित्य नष्ट करत संशयित आरोपी सचिन मनोज तडवी, दिलावर अन्वर तडवी यांना ताब्यात घेत दारुबंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. शिवारात पोलीस आल्याची माहिती मिळताच इतर हातभट्टीची दारु निर्मिती व विक्री करणाऱ्यांनी धुम ठोकली.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्वच गावागावातून अवैध धंद्याच्या विरोधात वॉश आऊट मोहीम राबविण्यात येणार असून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी जाहीर केले आहे. या झालेल्या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून सुज्ञ नागरिक व महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.