भडगावात महाविकास आघाडीच्या एकतेची वज्रमूठ करण पाटील यांच्या प्रचार फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद
भडगाव-
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांची आज शहरातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ठिकठिकाणी करणदादांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरलेले शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराच्या पाचोरा-भडगाव तालुक्यातील प्रचाराची धुरा वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी समर्थपणे सांभाळली आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये त्यांनी गावागावांमध्ये जाऊन महाविकास आघाडीसाठी कौल मागितला.
दरम्यान, आज भडगाव शहरातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. आजच्या फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्वत: करणदादा पाटील हे सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या सहकार्यांसह शहरातील कान्याकोपर्यातील मतदारांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल देण्याचे आवाहन केले. या प्रचार फेरीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागत झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी करण पवार यांना मतदान करून विजयी करणार असल्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया याप्रसंगी अनेक मतदारांनी व्यक्त केली.
आजच्या प्रचार फेरीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि मित्रपक्षांच्या आघाडीतील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.