आठ वेळा मतदान करणाऱ्या तरुणास अटक;निवडणूक आयोगाने घेतली दखल, मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे दिले आदेश
उत्तर प्रदेश-
उत्तरप्रदेश येथील एटामध्ये एका मतदान केंद्रावर तरुणाने आठ वेळा मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच सपाचे नेते अखिलेश यादव यांनी यासंबंधीचा व्हिडिओ ट्वीट करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्या मतदान केंद्रावर पुन्हा फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
याबाबत माहिती अशी की, उत्तरप्रदेशमधील एटा या मतदान केंद्रावर एका तरुणाने 8 वेळा मतदान केल्याचा प्रकार घडला. या तरुणाने त्याचा व्हिडिओ शूट करत समाज माध्यमांवर शेअर केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच अखिलेश यादव यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एटा जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच ज्याने आठ वेळा मतदान केले त्या तरुणाला अटकही करण्यात आली आहे. राजन सिंग असे या तरुणाचे नाव असून तो खीरियामधील पामरन गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित मतदान केंद्रावरील पक्षाच्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. उर्वरित टप्प्यात या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचेही आदेश देण्यात आले.