पाचोऱ्यात शिंदे अकॅदमीच्या माध्यमातून बाप्पाचे ४ विविध रूपांत दर्शन-अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गणपती दर्शनाला भाविकांच्या रांगा.
पाचोरा-
येथील शिंदे अकॅदमी आयोजित “गणेशोत्सव- २०२३” अंतर्गत “कलेचे दैवत”असलेल्या गणपती बाप्पाची ४ विविध रूपे पाचोरा शहरात साकारलेली आहेत.भाजपा अध्यक्ष व विधानसभा निवडणुक प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी गणपतीची विविध रूपे साकारली जातात. या शृंखलेचाच एक भाग म्हणून यंदा शिंदे अकॅदमीत गणपतीची ४ विविध रूपे बघण्यासाठी आशीर्वाद हॉल,भडगाव रोड, पाचोरा येथे भाविकांची गर्दी उसळली आहे.
शिंदे अकॅदमी च्या यंदाच्या गणेश दर्शनामध्ये सर्वप्रथम ३३०० पाण्याच्या बाटल्यांचा “दगडूशेठ हलवाई गणपती”साकारलेला आहे. १२ फूट बाय १५ फूट आकाराच्या चेन लिंक फ्रेम मध्ये रंगीबेरंगी बाटल्यांचा वापर करून साकारलेले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन भाविकांना मोहित करते.
हॉलच्या दुसऱ्या बाजूला सहा फूट बाय चार फूट आकाराच्या चौकटीत थ्रीडी गणपती भाविकांना आपल्या तीन रूपातून दर्शन देत आहे. तीन वेगवेगळ्या दिशेतून गणपतीकडे बघताना सर्वप्रथम लालबागचा राजा, त्यानंतर बालगणेश,आणि चिंतामणी गणेश अशा तीन गणपती बाप्पाचे दर्शन एकाच थ्रीडी फ्रेम मध्ये भाविकांना होत आहे.
आशीर्वाद हॉलच्या मधोमध वाळू शिल्पाची आकर्षक कलाकृती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. १२ फूट बाय १२ फूट लांबी- रुंदीच्या नर्मदा वाळूच्या ढिगावर पाच फूट उंचीच्या वाळू शिल्पात भगवान शिवशंकर व पहुडलेला बाल गणेश बघण्याची संधी पाचोरेकरांना मिळाली आहे.
तर चौथ्या कला प्रकारात “पुठ्ठा मांडणी पद्धती” मधून साकारलेला सावलीचा गणपती ही एक विलक्षण कलाकृती भाविकांना अचंबित करीत आहे.
अमोल भाऊ शिंदे यांच्या मूळ संकल्पनेतून कलेचे दैवत असलेल्या गणपती बाप्पाची ही चार रूपे साकारलेली आहेत. ही कलाकृती साकारण्यासाठी पाचोरा येथील कलाशिक्षक राहुल पाटील सर, मुंबईचे कला उपासक चेतन राऊत ,आणि वेंगुर्ला (गोवा) येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांचे सह १५ स्थानिक सह कलाकारांनी सुमारे आठ दिवस अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत. जास्तीत जास्त भाविकांनी येऊन गणपती दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अमोलभाऊ शिंदे यांनी केले आहे.
शिंदे अकॅडमीची कलात्मक परंपरा
२०१६- रांगोळीचा महागणपती
२०१७- मऊ मऊ कापसाचा बाप्पा
२०१८- कलाकारांच्या कलाविष्कारातील बाप्पा
२०१९- कागदी कपांचा बाप्पा
२०२०- विविध धान्याचा गणपती बाप्पा
२१ -२२- कोरोना कालावधीमुळे खंड
२०२३- कलेच्या दैवताची ४ रूपे