दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीए पेक्षाही कठोर कायदा करावा लागेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई-
दूध आणि दुधापासून बनणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही. कारण सरकार पातळीवर या विरोधात आता मोठी मोहीम राबवली जाणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच या विषयावर बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर पाऊल उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही. रमणी पॅटर्न राबविणे तसेच राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी आयोजित संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम, माजी आमदार सुरेश धस यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. चहल, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अन्न व औषश प्रशासन विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, तसेच केंद्रीय एफएसएसएआयचे अधिकारी उपस्थित होते.