पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने
गणपती मंडळाचे परीक्षण
पाचोरा-
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पाचोरा पोलीस ठाणे हद्दीतील 20 गणपती मंडळाचे प्राथमिक परीक्षण काल दिनांक 14 रोजी करण्यात आले. या प्राथमिक परीक्षणात गणपती मंडळाची अधिकृत नोंदणी, अधिकृत वीज जोडणी, देखावा, उत्सवातून दिले जाणारे प्रबोधनात्मक संदेश, शिस्त, स्वच्छता, स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा, गणपती मूर्तीची उंची यासह अन्य निकष तपासण्यात आले. या प्राथमिक निरीक्षणानंतर विसर्जन मिरवणुकीत अंतिम निरीक्षण व गुणदान करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस दलातर्फे दरवर्षी गणपती मंडळांना प्रोत्साहन पर बक्षिसे दिली जातात. प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत तीन गणपती मंडळांची निवड होते. त्यातून जिल्ह्यातील आदर्श गणपती मंडळांची निवड केली जाते. यावर्षी पाचोरा पोलीस ठाणे अंतर्गत एकूण 20 मंडळे स्पर्धेत आहेत. उपविभागीय पोलीस अधीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे समवेत पाचोरा पोलीस ठाणे अंतर्गत सार्वजनिक गणेश उत्सव परीक्षण समिती सदस्य प्रा. सी. एन. चौधरी, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. स्वप्नील पाटील, माजी नगराध्यक्ष विष्णू बापू सोनार, आणि ॲड.कविता रायसाकडा यांनी गणपती आरास चे परीक्षण केले. निरीक्षण पथकात पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील,पोलीस कर्मचारी गजानन काळे, सुनील पाटील, दीपक पाटील , होमगार्ड कपिल पाटील उपस्थित होते.