मुंबई-
गजबजलेल्या स्टेशनवर १९५ टीसींचा सर्जिकल स्ट्राईक, १६४७ फुकट्यांकडून लाखोंची वसुली करण्यात आली आहे.
लोकलमधील वाढत्या गर्दीत विनातिकीट प्रवाशांची संख्या मोठी आहे. विनातिकीट प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात रेल्वेने शनिवारी एकाच दिवशी तब्बल १९५ तिकीट तपासनीसांची नियुक्ती करून तब्बल १,६४७ प्रवाशांवर कारवाई केली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात एका रेल्वे स्थानकावर एका दिवसात विनातिकीट प्रवासी पकडण्याचा हा उच्चांक असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
https://youtu.be/zYz8idS2nk0?si=y67EVKwjK_eiCZsv
रेल्वे स्थानकातील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी ‘मेरा तिकीट, मेरा इमान’ अशी मोहीम पश्चिम रेल्वेने सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, वातानुकूलित लोकल आणि मालडबा यातील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात शनिवारी तब्बल १९५ तिकीट तपासनीसांनी सकाळपासून तपासणी सुरू केली. फलाटावर, पुलावर, स्थानकातील प्रवेशद्वार आणि अन्य ठिकाणी दिवसभर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेतून १,६४७ प्रवाशांवर कारवाई करत ४ लाख २२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवासी कारवाईच्या दंडाची ही एका दिवसातील सर्वाधिक रक्कम आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
एरवी सामान्य तपासणीमध्ये दादर स्थानकातून रोज सरासरी २३० प्रवाशांवर कारवाई होते. मात्र या मोहिमेनंतर आता स्थानकात अधिक तिकीट तपासनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कारवाईची माहिती प्रवाशांनी एका अॅपवरही शेअर केली. अनेक प्रवाशांनी दादर रेल्वे स्थानकांतील टीसींच्या पथकांचे, तपासणीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केला होता. तिकीट तपासनीसांमुळे शनिवारी दादर रेल्वे स्थानकातील तिकीटविक्रीचा महसूल ३८ टक्क्यांनी वाढला. शनिवारी २३ सप्टेंबरला स्थानकातील तिकीट विक्रीतून ११.४४ लाखांचा महसूल मिळाला होता. तर, ३० सप्टेंबरला हा आकडा १५.८९ लाख रुपयांवर पोहोचला.