माहेरहून ५० हजार रुपये आणावे म्हणुन विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
पाचोरा-
माहेरहुन घर खर्चासाठी ५० हजार रुपये आणावे अशी मागणी सासरच्या मंडळींकडून विवाहितेस होत होती. यासोबतच पतीचे दुसऱ्या महिलेसह असलेले संबंध या कारणामुळे पती व पत्नीत होत असलेला वाद या कारणांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पतीसह सासरच्या ४ जणांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, मांडकी ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या पुजा हिचा विवाह टिटवी ता. पारोळा येथील गणेश बापु पवार याचेशी २ जुलै २०२१ रोजी मांडकी ता. पाचोरा येथे झाला होता. लग्नात पुजा हिच्या आईने १ लाख ५० हजार रुपयांचे दागिने केले होते. लग्नानंतर ६ महिने चांगली वागणूक मिळाल्यानंतर पुजा हिच्या लक्षात आले की, पती गणेश पवार याचे दुसऱ्या महिले सोबत संबंध आहे. या कारणावरुन पुजा व गणेश यांच्यात वारंवार शाब्दिक वाद होत असत. दरम्यान पुजा ही होणाऱ्या त्रासाला कंटाळून मांडकी ता. पाचोरा येथे माहेरी व्यास्तव्यास होती. दरम्यान नातेवाईकांनी मध्यस्थी करत पुजा हिला सासरी नांदायला पाठविले होते. मात्र गणेश पवार याचे दुसऱ्या महिले सोबत संबंध सुरुच होते. यासोबतच माहेरहुन ५० हजार रुपये आणावे अशी मागणी पुजा हिच्या कडे वारंवार होवु लागली. अखेर सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुजा हिच्या फिर्यादीवरून गणेश बापु पवार (पती), बापु पवार (सासरे), मिना बापु पवार (सासु), उमेश उर्फ सुनिल बापु पवार (दिर) यांचे विरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक हटकर हे करीत आहे.