12जानेवारी 2024 पासून सीएसएमटी-उरण लोकल धावणार
मुंबई-
सीएसएमटी ते उरण दरम्यान येत्या शुक्रवारपासून लोकल रेल्वे सेवा सुरू होणार आहे.
चाकरमान्यांसाठी हि आनंदाची बातमी असून,वर्षभरापासून रखडलेली ही लोकल सेवा अखेर सुरु होणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 12 जानेवारी 2024 रोजी या रेल्वेमार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उरण शहरात मुंबई लोकल सेवा पुरवण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता.
नवी मुंबईच्या स्थापनेनंतर अनेक दशकांपूर्वी सीएसएमटी ते बेलापूर लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, बेलापूरपासून उरण असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे बेलापूर ते उरण अशी लोकल सुरु करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता. यानंतर मुंबई लोकल प्रशासनाने लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. अखेर येत्या शुक्रवारपासून सीएसएमटी ते उरण लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बेलापूर ते उरणदरम्यान लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांचा भरपुर वेळ वाचणार आहे. काही प्रवाशांनी सेवा सुरू होण्यास उशीर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी उरण रेल्वे मार्गाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. याशिवाय, नरेंद्र मोदी ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील, अशी माहिती प्राप्त होत आहे.