जळगाव एसटी विभाग राम भक्तांना घडविणार अयोध्या दर्शन.
जळगाव-
उत्तर प्रदेश अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी एसटी विभागाकडून सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार जळगाव एसटी विभागाने पाच बसस्थानकांवरून राम भक्तांना अयोध्येला जाण्यासाठी एसटी बसची सुविधा करण्यात आली आहे.
अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातून अयोध्येला जाण्यासाठी भाविकांकडून एसटीसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होत होती. त्या अनुषंगाने जळगाव एसटी विभागाने जळगाव, चोपडा,चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर या आगारातून अयोध्या, प्रयागराज, वाराणसी (काशी) येथे ४२ प्रवासी असलेली एसटी सुविधा केली आहे. यासाठी भाविकांना ॲडव्हान्स बुकिंगनुसार एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात सुविधेत कोणतीही सवलत प्रवाश्यांना मिळणार नाही. तिकीट बुकिंग तसेच अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापकांशी संपर्क करावा, असे आवाहन जळगाव एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.
राहणे, जेवण इतर खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे,अयोध्या, प्रयागराज व वाराणसी येथे दर्शनासाठी एसटी केवळ प्रवाशांची ने-आण करणार आहे.