भडगांव येथेच होणार आरटीओ कार्यालय-आमदार किशोर आप्पा पाटील यांची ग्वाही
भडगांव-
जळगाव आरटीओ कार्यालयीवरील कामकाजाचा भार पाहता त्या कार्यालयाचे विभाजन होऊन नविन कार्यालय हे भडगाव येथे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात प्रस्ताव हा शासनदरबारी अंतिम टप्प्यात आहे. चाळीसगांव येथे आरटीओ कार्यालयाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कुठल्याही परीस्थीतीत भडगांवलाच आरटीओ कार्यालय होईल यात शंका उपस्थित करण्याचे कारण नाही अशी स्पष्ट भुमिका आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मांडली.
गेल्या 10 वर्षापासून भडगाव येथे आरटीओ कार्यालय संदर्भात मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. भौगोलिकदृष्ट्या जळगांव नंतर भडगांव हे इतर तालुक्याना मध्यवर्ती ठिकाण येते. त्यामुळे परीवहन विभागाकडुन भडगांव येथे कार्यालय प्रस्तावित केले आहे. तसा प्रस्ताव शासन दरबारी गेलेला आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. केवळ योग्य जागेअभावी तो इतक्या दिवस प्रस्ताव रेंगाळला होता. 2-3 महिन्यापूर्वीच कोळगांव रस्त्यावरील व पाचोरा रस्त्यावरील शासकीय आयटीआय समोरील जागेची चाचपणी करण्यात आली आहे. कुठली तरी एक जागा आरटीओ कार्यालयासाठी निश्चित करण्यात येणार आहे. मी स्वत: त्यासाठी पाठपुरावा करत आहे. त्यामुळे हे कार्यालय चाळीसगांव ला मंजुर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चाळीसगाव चा प्रस्तावच शासनाकडे अजूनपर्यंत गेलेला नाही. त्यामुळे तेथे मंजुरी कशी काय मिळेल? असा प्रश्न आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थीत केला आहे. जर हे कार्यालय चाळीसगांव ला केले तर जळगांव कार्यालय विभाजन करण्यास अर्थ काय आहे? पाचोरा हून चाळीसगांव 50 किलोमिटर आहे तर पाचोऱ्याहून जळगांव ही 50 किलोमिटर येते. तीच स्थिती इतर तालुक्याची आहे. भडगांव हे या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या प्रत्येक तालुक्याला अंत्यत सोयीचे ठिकाण आहे. त्याअनुषंगाने परीवहन विभागाने भडगांवचा आरटीओ कार्यालयासाठी प्रस्ताव पुढे केला आहे. कार्यालयाचे विभाजन हे लोकांच्या सोयीसाठी होणार आहे. त्यामुळेच ते भौगोलिकदृष्ट्या भडगांव ला योग्य होणार आहे. त्यामुळे मी हा हट्ट प्रतिष्ठेचा करत आहे असे नाही.
मी पुढच्या आठवड्यात स्वतः मुख्यमंत्र्याची भेट घेऊन भडगांवच्या आरटीओ कार्यालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी करणार आहे. भडगांव तालुक्याच्या नागरीकांना मी आश्वस्त करतो की भडगांव येथील प्रस्तावित आरटीओ कार्यालय हे भडगावलाच होईल. हे कार्यालय कुठेही जाऊ देणार नाही असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.