माझी शाळा-सुंदर शाळा अभियान
विभागीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या कै. पि.के. शिंदे शाळेचा गौरव
पाचोरा-
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे संपूर्ण राज्यात राबवण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात पाचोरा येथील कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाने जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर नाशिक विभागातून तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल महाराष्ट्र शासन शालेय विभागातर्फे मुंबई येथे गौरवण्यात आले.
आज दिनांक 5 मार्च रोजी, टाटा थिएटर, (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स), नरिमन पॉईंट मुंबई येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते गिरणाई शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ व शिक्षकांना नाशिक विभागीय तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 11 लाख रुपयाचा धनादेश व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार शेखर निकम, शिक्षक नेते संभाजी थोरात, प्रधान सचिव रणजित सिंग देवोल,शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ॲड ज्युरीकेटर प्रवीण पटेल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकावल्या बद्दल मिळालेला गौरवास्पद पुरस्कार स्वीकारताना गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सचिव दादासाहेब ॲड जे .डी. काटकर, उपाध्यक्ष नीरज भाई मुणोत,सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. गीते , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सू.ना. पाटील, मुख्याध्यापक महेश देशमुख, विद्यालयातील शिक्षक व्ही. पी. देशमुख, श्रीमती सुषमा पाटील, श्रीमती वैशाली भालेराव याप्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील शाळांची गुणवत्ता वाढ व विकास होण्याच्या दृष्टीने “मुख्यमंत्री, माझी शाळा -सुंदर शाळा” हे अभियान राबवण्यात आले. संपूर्ण राज्यातील 103312 शाळांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कै.पि.के. शिंदे विद्यालयाने राबवलेले वित्तीय साक्षरता विषयक अभ्यासक्रम, अणुशास्त्रज्ञ डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी संकलित केलेला ग्लोबल सायन्स अभ्यासक्रम, गुणवत्ता संवर्धनाचे उपक्रम, तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग नोंदवलेले उपक्रम, विविध विषयांवर तज्ञांची व्याख्याने, समृद्ध ग्रंथालय व प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमांची नोंद या अभियानात घेण्यात आली. शालेय गुणवत्तेची परंपरा कायम राखणाऱ्या शिंदे शाळेने विभागीय स्तरावर नावलौकिक मिळवल्याबद्दल गिरणाई शिक्षण संस्था व शाळेतील शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.