नाशिक-
‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली चालविला जाणारा देहविक्रीचा अड्डा इंदिरानगर पोलिसांनी बनावट ग्राहक (डि-कॉय) पाठवून उद्धवस्त केला.नाशिकमधील पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हिलक्रिस्ट नावाच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका गाळ्यामध्ये हा अवैध व्यवसाय चालविला जात होता. पोलिसांच्या पथकाने याठिकाणाहून दोन पिडित महिलांची सुटका केली आहे. तसेच संशयित चौघा पुरूषांना ताब्यात घेतले आहे.
पाथर्डी गावाच्या शिवारात एका व्यापारी संकुल असलेल्या इमारतीत स्पाच्या नावाखाली देहविक्रीचाअड्डा चालविला जात असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांना मिळाली. मागील काही दिवसांपासून हा देहविक्री चा अड्डा चालविला जात होता.
शरमाळे यांनी या बाबत खात्री पटवून छापा टाकण्याची तयारी केली. बनावट ग्राहक तयार करून त्याच्याकडे पाचशे रूपयाच्या चार चलनी नोटा दिल्या. बनावट ग्राहकाने स्पा सेंटरमध्ये प्रवेश करत काउंटरवर रक्कम जमा केली आणि यावेळी काउंटरजवळ बसलेल्या महिलेने त्याला दोन महिलांना दाखविले. एका पार्टेशन असलेल्या खोलीत एका महिलेसोबत पाठविले. या बनावट ग्राहकाने ‘मिस्ड कॉल’चा इशारा देताच पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहाय्यक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक सुहासिनी बारेला, अंमलदार जावेद खान, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, चंद्रभान पाटील, धनवंता राऊत यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने गाळ्यामध्ये छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी दोन पिडित महिलांकडून देहविक्रय करून घेतले जात असल्याचे निष्पन्न झाले.
यावेळी विजयकुमार नायर (४३,रा.दामोदरनगर), सुलेमान मुबारक हुसेन अन्सारी(३५), अजय बबलू चव्हाण (३०,रा.दामोदरनगर), रवि कोंडाजी मुठाळ(२७,रा.लहवित) यांच्यासह एका महिलेलाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरूद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निखिल बोंडे हे करीत आहेत.