दिलीपभाऊ वाघ युवा फाउंडेशन, पाचोरा यांच्या वतीने महिला दिनानिमित्त माता-भगिनींचा सन्मान.
पाचोरा-
महिला दिनानिमित्त दिलीपभाऊ युवा फाऊंडेशन चा वतीने एम एम कॉलेज पाचोरा येथील मैदानावर समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या जाहिर किर्तनाचे आयोजन करत महिलांचा सत्कार करण्यात आला.ज्याचे सत्कार करण्यात आले त्यांची थोडक्यात माहिती.
गंगाभागीरथी सकूआई बाबूलाल
तडवीः
सकूआईना संसाराला हातभार लावण्यासाठी आपल्या पतीसोबत उसतोड़, शेतमजूरी, माती काम करुन उदरनिर्वाह करावा लागत असे. त्यात पदरात ४ मूल व ४ मुली असे ८ लेकर ! त्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी त्या स्वतः पाइपलाइन, रोड, धरण, नालाबिल्डिंग अशा खोकामासाठी जाऊ लागल्या. २००७ मध्ये त्यांचे पती जग सोडून निघून गेल्यामुळे परिवाराची पूर्ण जबाबदारी पडली. त्यांच्च्या कष्टामुळे सर्व मुले उच्च शिक्षित झाले. त्यांचा एक मुलगा दगडू MA (Marathi) B. Ed असून त्यांचे एक सुपुत्र आपल्या वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत डॉ. श्रावण तडवी हे जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज सदस्य असून अर्थशास्त्र विषयाचे पीएचडीचे गाईड आहेत. त्यांचे अजून एक सुपुत्र रशीद हे इतिहास या विषयात MA B. Ed असून सध्या जालना येथे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांचे अजून एक सुपुत्र फिरोज हे अर्थशास्त्र व इतिहास या विषयात MA असून सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. फिरोज हे केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या विभागत कार्यरत आहेत. त्यांची कन्या मुन्नी ही मानसशास्त्र विषयात MA असून सध्या पिंपळगाव येथील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. तर त्यांची अजून एक सुकन्या शबाना ही मानसशास्त्र विषयात MA असून सेट परीक्षा उत्तीर्ण करून सध्या मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर त्यांची कन्या सुनिता ही इंग्रजी विषयात MA असून सेट उत्तीर्ण केल्यानंतर जळगावच्या एम जे महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. या अगोदर आदरणीय आईना यावल येथे साने गुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
सौ मीनाक्षीआई प्रदीप पांडे:
पाचोऱ्यातील मतिमंद शाळेजवळ निवासी असलेल्या 69 वर्षीय सौ मीनाक्षीआई यांचे शिक्षण DSEMR हे झालेले असून १९९१ पासून त्या मतिमंद मुलांच्या माता म्हणून सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी ग्राहक सेवा संघामध्ये सुद्धा कार्य केलेले असून त्यांना या अगोदर ‘आई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
सौ सुनीताताई योगेश पाटीलः
पाचोरा शहराच्या जारगाव चौफुलीजवळ राहणाऱ्या 32 वर्षीय आदरणीय सुनीताताई या कीर्तनकार व अनाथांची माय म्हणून या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. BA पर्यंत शिक्षण घेतलेल्या सुनीताताईंना दैनिक देशदूत तर्फे ‘अनाथांची माय’ म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आदरणीय सुनीताताई व योगेश महाराज हे लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
गंगाभागीरथी सुमित्राआई रमेश महाजनः
पाचोरा शहराच्या आशीर्वाद कॉटेजमध्ये राहणाऱ्या गंगाभागीरथी सुमित्राआई रमेश महाजन यांनी त्यांचे पती कैलासवासी रमेश भिला महाजन यांचे 33 वर्षांपूर्वी दुर्दैवी निधनानंतर घरगुती मजुरीवर पापड बनवण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून चार मुलींचे व एका मुलाचा विवाह केला.
गंगाभागीरथी मालतीआई अविनाश भावेः
87 वर्षाच्या असलेल्या गंगाभागीरथी मालतीआई अविनाश भावे या 1993 पासून आजतागायत सातत्याने पाचोरा शहरातील एका बालवाडीत अध्यापनाचे कार्य करीत आलेल्या आहेत. त्यांना दोन मुले असून 2007 या वर्षी त्यांचे पती कै अविनाश भावे यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांनी दोन मुलांना शिक्षण शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांचे मोठे सुपुत्र गिरीश हे सध्या टॅक्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून त्यांचे कनिष्ठ सुपुत्र अजय हे धनश्री फायनान्स येथे कॅशियर म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागामधील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मागील 31 वर्षांपासून सातत्याने धडपड करणाऱ्या आईला मा दिलीपभाऊ वाघ युवा फाउंडेशन यांच्यावतीने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.
गंगाभागीरथी मंगलाआई मधुकर कुलकर्णीः
पाचोरा शहराच्या भवानीनगर येथे राहणाऱ्या आदरणीय मंगलाआईचे शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत झालेले असून 2022 या वर्षी त्यांच्या पतीं कैलासवासी मधुकर दत्तात्रय कुलकर्णी यांचे दुर्दैवी निधन झाले. 1981 पासून, सातत्याने 42 वर्षांपासून त्या पाचोरा शहरात कुलकर्णी खानावळ सांभाळीत आहेत. त्यांना चार मुले असून मोठ्या मुलगा राजेंद्र हा कॅनरा बँकेत कार्यरत असून लहान मुलगा मुकेश हा एमबीए आहे. पाचोरा पंचक्रोशीतील भुकेल्यांची क्षुधाशांती करणाऱ्या अन्नपूर्णा म्हणून संपूर्ण पाचोरा पंचक्रोशीमध्ये त्या सुपरीचीत आहेत. आदरणीय आईना मा दिलीपभाऊ वाघ युवा फाउंडेशन यांच्यावतीने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
गंगाभागीरथी सरलाआई दत्तात्रेय सोनारः
पाचोरा शहराच्या आदर्श नगर या भागात राहणाऱ्या 65 वर्षीय सरलाआई या इयत्ता चौथी शिकलेल्या असून मागील 35 वर्षांपासून त्या सातत्याने पाचोरा पंचक्रोशीमध्ये निरपेक्ष भावनेने लहान बाळांची आंघोळ करून देतात. गरजू कुटुंबाचा स्वयंपाक करून देतात. त्यांना एक मुलगा असून त्यांचे सुपुत्र मुकेश खरोटे हे पाचोरा बस डेपोमध्ये एसटी ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सुनबाई सुद्धा मराठी विषयांमध्ये एम ए आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता प्राप्त परिस्थितीमध्ये संघर्ष करत कुटुंबाला आधार देणाऱ्या सरला आईचा जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मा दिलीपभाऊ वाघ युवा फाउंडेशन यांच्यावतीने आज यथोचित सन्मान होत आहे.
गंगाभागीरथी श्रीमती प्रमिलाआई प्रकाश चौधरीः
पाचोरा शहरातील प्राध्यापक कॉलनीत निवासी असलेल्या प्रमिलाआई ह्या पाचोरा महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या दिवंगत प्रा प्रकाश धोंडू चौधरी यांच्या भार्या आहेत. त्यांनी धुळे शहरातून समाजशास्त्र या विषयांमध्ये बीए पूर्ण केले. 1991 मध्ये पतीचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर 1992 या त्या पाचोरा ग्रंथालय परीचर म्हणून कार्यरत झाल्या. त्यांचा एकमेव मुलगा चेतन याला त्यांनी M Sc B Ed पर्यंतचे शिक्षण दिले. त्यांच्या सुनबाई जयश्रीताई या सुद्धा BSc आहेत. प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहत, स्वतःच्या सुखाला तिलांजली देत, मुलाला उच्चशिक्षित करणाऱ्या या मातेला सन्मानित करताना अभिमानाने उर भरून येते.
डॉ सपनाताई रोहित बोथराः
पाचोरा शहराच्या इंदिरानगर मध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय डॉ सपनाताई रोहित बोथरा यांनी राशी सीड्सतर्फे आयोजित उपक्रमाअंतर्गत जवळजवळ दीड वर्षांपर्यंत पाचोरा तालुक्यातील रुग्णांना निस्पृह भावनेने वैद्यकीय सेवा पुरवली. पाचोरा तालुक्यातील रुग्णांसाठी त्यांच्या या मानवतावादी कार्यासाठी त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे.
गंगाभागीरथी आशाआई कृष्णा चिकटेः
पाचोरा शहराच्या तलाठी कॉलनीच्या रहिवासी असलेल्या आशाआई ह्या दहावी उत्तीर्ण असून, त्यांचे पती कैलासवासी कृष्णा ओंकार चिकटे यांचे करोना काळात दुर्दैवी निधनानंतर दोन मुलांचा सांभाळ करीत या माऊलीने प्रसंगी बांगड्या विकून व पिको, फॉल करून आपल्या मोठ्या मुलाला M Sc चे शिक्षण दिले, लहान मुलाला सुद्धा BA केले.
गंगाभागीरथी शैला प्रवीण नेवेः
पाचोरा शहरातील शाहूनगर मध्ये राहणाऱ्या शैलाआई यांचे शिक्षण B Com पर्यंत झालेले असून त्यांचे पती कैलासवासी प्रवीण शंकर नेवे यांचे करोना काळात दुर्दैवी निधनानंतर त्या कैलामाता मंदिराच्या बाजूला जय मातादी पूजा भंडार चालवतात. त्यांनी प्राप्त परिस्थितीत संघर्ष करत आपल्या मुलाला M Com पर्यंतचे शिक्षण दिले. त्यांचे सुपुत्र सध्या HDFC बँकेत कार्यरत आहेत.
गंगाभागीरथी सोनालीताई समाधान पाटीलः
पाचोऱ्यातील शाहूनगरच्या निवासी असलेल्या सोनालीताई या इयत्ता बारावी पर्यंत शिकलेल्या असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे पती कैलासवासी समाधान आत्माराम पाटील यांचे वयाच्या 42 व्या वर्षी अकस्मात निधन झाले. प्राप्त परिस्थितीत डगमगून न जाता एम एम कॉलेजच्या समोर असलेले छत्रपती दुग्धालय त्या यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. त्यांचा मोठा मुलगा इयत्ता नववीत शिकत असून मुलगी सातवीत शिक्षण घेत आहे. पतीच्या दुर्दैवी निधनानंतर परिस्थितीशी दोन हात करत आपल्या दोन लेकरांचा सांभाळ करणाऱ्या सोनालीताईंना आपण सन्मानित करीत आहोत.
श्रीमती आशाताई दगडू भुजंगेः
पाचोऱ्यातील नागसेननगर येथील रहिवासी 35 वर्षीय आशाताई ह्या दिवंगत श्री दगडू भुजंगे यांच्या सुकन्या असून त्यांचे शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत झालेले आहे. सध्या त्या पाचोऱ्यातील प्रथम महिला रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहेत. घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना सुद्धा आईला सांभाळत त्यांनी दोन बहिणींची लग्न केली. नुसताच नशिबाला दोष न देता त्यांनी परिस्थितीशी दोन हात करत पुण्यात स्कूल बस चालवली. स्वतःच्या सुखाला तिलांजली देत लग्न न करता अविवाहित राहून आपल्या बहिणी व भाऊ यांच्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. त्यांना स्वामी समर्थ सेवा मार्ग, पाचोरा तथा शारदा स्कूल यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आलेले आहे.
गंगाभागीरथी आशाताई सुनील कोठावदेः
पाचोरा तालुक्यातील शिंदाड या गावच्या रहिवाशी आशाताई सुनील कोठावदे यांचे शिक्षण इयत्ता बारावी पर्यंत झालेले असून त्यांचे पती कैलासवासी सुनील पांडुरंग कोठावदे यांचे करोनाच्या आजारात दुर्दैवी निधन झाले. परिस्थितीला दोष देत नुसतेच बसून न राहता त्यांनी शिलाई मशीन चालवून आपल्या कुटुंबाला आधार दिला. त्यांचा सुपुत्र नाशिक येथे इयत्ता अकरावीत सध्या शिक्षण घेत आहे.
गंगाभागीरथी कविता विनायक पाटीलः
इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण झालेल्या कविताताई या पाचोऱ्या तालुक्यातील शिंदाड येथील रहिवासी असून त्यांच्या पतीचे कोरोनात दुःखद निधन झाले. पतीच्या दुःखद निधनानंतर परिस्थितीशी संघर्ष करत त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दोन मुलींना त्यांनी शेतात मोलमजुरी करून साक्षर केले. एका मुलीचे लग्न केले. त्यांची एक मुलगी इयत्ता बारावीत शिकत आहे.
श्रीमती मनीषाताई दशरथ कोठावदेः
इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या पाचोरा तालुक्यातील शिंदाडच्या रहिवासी असलेल्या 51 वर्षीय मनीषाताई या सध्या शिंदाड येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. जबरदस्त जिद्द व अदम्य साहस यांचे उत्कृष्ट उदाहरण समाजापुढे सादर करीत मनीषाताई ह्या कुटुंबाचा आधार बनत त्याच्या दोन भाच्याना शिक्षण देत आहेत. त्यांची एक भाची इयत्ता नववी व एक भाची इयत्ता सातवीत शिकत आहे. समाजकार्याची आवड असलेल्या मनीषाताईंना या अगोदर शिंदाड ग्रामपंचायतीतर्फे सन्मानित करण्यात आलेले आहे.
गंगाभागीरथी रत्नप्रभाताई यशवंत मोराणकरः
पाचोरा शहरातील भास्करनगर येथे राहणाऱ्या, इयत्ता अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, रत्नप्रभाताई यांना दोन अपत्य आहेत. त्यांचे पती कैलासवासी यशवंत जगन्नाथ मोराणकर यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना साक्षर केले. त्यांचा मुलगा रूपक मोराणकर सध्या बजाज फायनान्स येथे कार्यरत आहे.
गंगाभागीरथी वृषालीताई भिकन येवलेः
पाचोरा शहरातील रंगार गल्लीमध्ये राहणाऱ्या चाळीस वर्षीय वृषालीताई येवले यांचे शिक्षण इयत्ता बारावी पर्यंत झालेले असून सध्या त्या नगरपालिका दवाखान्यात आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती कैलासवासी भिकन सुरेश येवले यांचे 2012 या वर्षी निधन झाल्यानंतर त्यांनी प्रसंगी शेवया, पापड बनवून तीन मुलांना शिक्षण दिले. त्यांची मोठी मुलगी पाचोरा महाविद्यालयात TYBA ला असून, दुसरी मुलगी बारावीचे शिक्षण घेत आहे व मुलगा सध्या दहावीत शिकत आहे.
गंगाभागीरथी प्रतिभाआई संतोष मराठेः
आदरणीय प्रतिभाआईच्या पतीचे कैलासवासी संतोष केशवराव मराठे यांचे 13 मे 2021 रोजी करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दुर्दैवी निधन झाले. ते घरीच एक छोटेसे किराणा दुकान चालवत असत. वडिलांच्या निधनापूर्वी त्यांचा मुलगा हर्षल एका जिममध्ये नोकरी करीत होता. घरात एक रुपया नसताना सुद्धा, घराची अत्यंत बिकट परिस्थिती असताना, आई व आजीने हिम्मत दिल्यानंतर त्यांनी जिम सुरू केली. लाईफ फिटनेस जिम ही पाचोरा शहरातली आज अत्यंत अत्याधुनिक जिम म्हणून ओळखली जाते या जिम मध्ये 300 हून अधिक विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहेत.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत पतीचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर सुद्धा संघर्ष करून आईने आपल्या लेकराला यशस्वी उद्योजक बनवले. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, सातत्यपूर्ण संघर्ष करत प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहणाऱ्या आईला आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत.
(20) गं.भा. उज्वलाताई राजू मोरे, पाचोरा 10 वर्षापुर्वी पतीचे निधनानंतर स्वयंपाकाचे कामे 2 मुले,
21) सौ. सखुबाई गोवर्धन जाधव, पाचोरा घरगुती आजारी व्यक्तींची सेवा व स्वयंपाकाचे काम करतात त्यांचा सन्मान करण्यात आला.
अभिलाषा रोकडे रोकडे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस, सरलाताई पाटील – जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सुरेखाताई पाटील- जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
रेखाताई पाटील – भडगाव तालुकाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
वैशालीताई जडे – महिल संघटक महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यांनी सत्कार केला. या वेळी मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती.
त्यानंतर प्रसिद्ध समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या भव्य किर्तनाचा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,किर्तनाचा लाभ घेण्यासाठी मोठा संख्खेने जनसमुदाय उपस्थित बघावयास मिळाला,
याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दिलीप भाऊ युवा फाऊंडेशन चा वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सत्कार मागील वर्षी हि करण्यात आला होता त्यावेळी सुद्धा हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या जाहिर किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.