आर. ओ. तात्यांच्या आठवणींनी गहिवरला जनसमुदाय;
पुण्यस्मरणाला पुष्पांजली अर्पण करण्यासाठी लागली रांग
पाचोरा-
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील असंख्य आबालवृध्दांच्या हृदयात आदराचे स्थान मिळवणारे दिवंगत लोकनेते तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी त्यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्यासमोर पुष्पांजली अर्पण करण्यासाठी मतदारसंघातील हजारो आबालवृध्दांनी हजेरी लावली. याप्रसंगी तात्यांच्या आठवणींनी अनेक जण गहिवरल्याचे दिसून आले.
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा निर्मल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते आर. ओ. तात्यासाहेब पाटील यांची आज पाचवी पुण्यतिथी निमित्ताने आज सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत निर्मल सीड्स कंपनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या तात्यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याजवळ पुष्पांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.
निर्मल सीड्सच्या संचालिका, निर्मल स्कूलच्या अध्यक्षा तसेच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी निर्मल परिवारातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या वडिलांना पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले. यानंतर निर्मल परिवार, शिवसेना-उबाठा, महाविकास आघाडीतील विविध मान्यवर तसेच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील हजारो स्त्री-पुरूषांनी तात्यांच्या पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले. यासाठी जनसमुदायाने रांग लावल्याचे दिसून आले.
आजच्याच पाच वर्षांपूर्वी तात्यांवर क्रूर काळाने झडप घालून त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले होते. याआधी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, समाजसेवा आणि महत्वाचे म्हणजे कृषी व उद्योग क्षेत्रात त्यांनी अजरामर भरीव कामगिरी केली. निर्मल उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी पाचोरा-भडगावचे नाव जगाच्या नकाशावर तर नेलेच पण या माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबाला रोजगार देखील दिला. त्यांच्या महान जीवनकार्याचे स्मरण करत अनेकांनी ओथंबलेल्या भावनांनी तात्यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पाचोरा भडगाव तालुक्यातले नागरिक तसेच निर्मल सीड्स चे समस्त संचालक मंडळ आणि कर्मचारी सदस्य व निर्मल इंटरनॅशनल स्कूल चे सर्व शिक्षक स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ यांची उपस्थिती होती.