शाळेत मुख्याध्यापकास मारहाण केल्या प्रकरणी;पाच जणांवर पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल.
पाचोरा-
स्वताला संस्थेचे संचालक म्हणून समजणारे संचालक व एका अनोळखी इतर पाच लोकांनी मुख्याध्यापक नरेंद्र जोशी यांचा सेवा समाप्तीचा वाद न्यायप्रविष्ट असतांनाही मनमानी पद्धतीने शाळेच्या मुख्याध्याकांना सेवा समाप्तीच्या कारणावरुन बेदम मारहाण केल्याची घटना सोमवार रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेबाबत पाचोरा पोलिस स्टेशनला संबंधित मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पाचोरा शहरातील विवेकानंद भागातील नामांकित शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक मा. श्री. नरेंद्र जोशी वय वर्षे (५४) हे नियमीतपणे शाळेत आल्यावर सकाळी मुख्याध्यापक कार्यालयात कामकाज करत असतांना सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास देशमुख वाडी भागातील रहिवासी स्वताला संस्थेचे संचालक समजून घेणारे प्रताप तावरे, रोहित तावरे, अनुजा तावरे, प्रविण देशमुख व एका अनोळखी इसमासह पाच लोकांनी अचानकपणे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात प्रवेश करुन तुझी सेवा समाप्त झाली असून तु येथुन निघून जा असे सांगितले तेव्हा नरेंद्र जोशी यांनी सांगितले की तुमचा माझ्यावर अधिकार नाही तुम्ही संचालक मंडळात नाहीत असे सांगितले असता प्रताप तावरे इतरांना याचा राग आला त्यांनी नरेंद्र जोशी यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी व लाथाबुक्क्यांनी हातावर, छातीवर, तोंडावर अमानुषपणे मारहाण केली. याच वेळी संशयित आरोपी अनुजा तावरे यांनी तु येथुन निघून जा नाहीतर तुला कायमचा संपवून टाकू असे बोलून एकप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली या हाणामारीत नरेंद्र जोशी यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला मार लागून करंगळीचे हाड मोडले तसेच उजव्या पायाचे बोट खुर्ची खाली दाबले गेल्याने जखम झाली असल्याचा आरोप करत नरेंद्र जोशी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून पाच संशयीत आरोपींविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला ३२३, ३२४, ३२५, १४३, १४७, ५०४, ५०६, ३४ अस प्रमाणे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.