विजेचा धक्का लागून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत;सोयगाव तालुक्यातील घटना.
पाचोरा-
शेतात वख्खर चालवितांना जमिनीवरुन दुसऱ्या शेतात गेलेली विजेची वायर तुटल्याने वख्खरला वायरच्या तारांचा स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय तरुणास विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने सोयगाव पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रमोद विष्णु जंजाळ वय – १७ रा. वणगाव ता. सोयगाव हा होतकरू तरुण शिक्षणासोबतच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा. २८ जुन रोजी सकाळी शेतात वख्खर चालवायचे असल्याने आई, वडिल व प्रमोद हे शेतात गेले होते. दरम्यान प्रमोद हा शेतात लोखंडी वख्खर चालवित असतांना त्यांच्या शेतातुन शेजारील शेतासाठी विजेची वायर जमिनीवरुन टाकण्यात आली होती. सदरची वायर प्रमोद याचे निदर्शनास आली नाही. नेमके वख्खरमुळे वायर तुटली व वायरच्या तारांचा स्पर्श वख्खरला होताच प्रमोद याचे हातात वख्खरचा दांडा असल्याने प्रमोद यास विजेचा जोरदार धक्का लागला. व त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी आई वडिलांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी वणगाव परिसरात पसरली असता एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने सोयगाव पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे.