
शिर्डी-
दिवसेंदिवस गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येत आहे कायद्याच्या धाक न बाळगता गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ होतांना दिसत आहे. अशी एक घटना शिर्डी पोलीस स्टेशन चा हद्दीत घडली आहे.
एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेतील संशयितास पाेलीसांनी अटक केली आहे. शिर्डी पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शिर्डी जवळील सावळीविहीर गावात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार जावयाने पत्नीची, मेव्हण्याची आणि आजे सासूची धारदार शस्राने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेत वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली. संशयित सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पाेलीसांनी व्यक्त केला आहे. संशयिताविराेधात शिर्डी पोलीस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.