उरण-
नवी मुंबईतील उरण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. उरण-पनवेल मार्गावरील एका 22 वर्षीय तरुणीची निघृणपणे हत्या करण्यात आली. एन. आय. हायस्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे वय वर्ष 22 हिची क्रूरतेने हत्या झाली. या घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या तरुणीची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
उरण शहरातील यशश्री शिंदे या तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेसंदर्भात सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येची माहिती आज (27 जुलै) पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळाली. उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्थळी तिचे हात, अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनसाठी नेण्यात आला.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यशश्री शिंदे ही दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. याबाबत तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच उरण शहराजवळ तीचा मृतदेह आढळून आला असून आरोपी हा दुसऱ्या समाजातील असल्याचे म्हटलं जात आहे. आता तिचा मृतदेह इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये आहे. प्रेमसंबंधातून तिची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. हत्या करणाऱ्या आरोपीने यशश्रीच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार केल्याचं समजतंय.
या मुलीच्या हत्येने सर्व उरणच्या तरुण, तरुणी, महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा एका विशिष्ट समाजातील असल्याचा आरोप यशश्रीच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी,त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही देखील त्यांनी केली आहे.