समग्र शिक्षा अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे शासन सेवेत समायोजन करा; जिल्ह्यांतील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे अभ्यास समितीला निवेदन
जळगाव-
समग्र शिक्षा अर्थात सर्व शिक्षा अभियानअंतर्ग कंत्राटी कर्मचाऱ्याचे शासन सेवेत समायोजन करावे. याबाबत अभ्यास समितीने सकारत्मक विचार करुन लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत शनिवारी अभ्यास समितीचे सदस्य शिक्षक आमदार किशाेर दराडे यांना जळगावात निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्व शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी २००३ पासून कर्मचारी कंत्राटी स्वरुपात तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. या अभियानसाठी ३३ प्रकारची पदे रितसर जाहिरात देऊन भरण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात या योजनेतंर्गत १६५ तर संपूर्ण राज्यात ६५०० कर्मचारी कार्यरत आहे. अल्पशः मानधनावर हे कर्मचारी शाळा भेटी देणे, प्रशिक्षण देणे घेणे, शाळाबाहय विद्यार्थी शोध मोहिम व अन्य कार्यालयीन कामकाज करीत आहे. कायम सेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या अभियानातील सुमारे १०० व्यक्तींचा सेवा बाजावताना मृत्यू झाला आहे; पण त्यांच्या कुटुंबाला शासनस्तरावरुन कोणतीही मदत मिळालेली नाही. तसेच अनेक कंत्राटी कर्मचारी सेवानिवृत्त देखील झाले आहे. याबाबत वेळाेवेळी शासन दरबारी प्रश्न मांडल्यानंतर समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २२ जुलै राेजी बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे समितीने अभ्यास करुन कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर समायोजन करावे. तसेच नवीन पदनिर्मिती न करता समग्र शिक्षातील त्याच पदावर कायम करावे अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार दराडे यांना निवेदन देताना जिल्ह्यातील समग्र शिक्षाचे कर्मचारी उपस्थित हाेते.