स्वस्त गणेश मूर्ती स्कीम आली अंगलट,मुर्तीकार पळाला,गणेश भक्तांची झाली पंचाईत..

डोंबिवली-
गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असतानाच डोंबिवलीत एक विचित्र घटना घडली. चिनार मैदानात मूर्ती विक्रीचा स्टॉल लावलेला मूर्तिकार अचानक पसार झाला. ही बाब कळताच ज्यांनी मूर्ती बुक केल्या त्या कल्याण, डोंबिवलीकरांनी गणेश कला केंद्रावर धाव घेतली आणि आपली मूर्ती मिळेल की नाही या शंकेने त्यांनी मिळेल ती मूर्ती घेऊन काढता पाय घेतला.
या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला. प्रफुल्ल तांबडे असे त्या मूर्तिकाराचे नाव असून त्याच्याविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूर्ती विकल्या जाव्यात यासाठी त्याने जाहीर केलेल्या स्वस्त स्कीममुळेच तो अडचणीत आला आणि पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रफुल्ल तांबडे या मूर्तिकाराने चिनार मैदानात दोन मोठे मंडप घालून आनंदी कला मूर्ती केंद्र सुरू केले. त्या केंद्रात असलेल्या आकर्षक मूर्ती पाहून गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणावर मूर्ती बुक केल्या. तांबडे याने स्वस्त मूर्ती स्कीम सुरू केल्याने त्यावर गणेशभक्तांच्या अक्षरशः उड्या पडल्या. त्यासाठी त्याने पेणवरून काही कारागीर मूर्ती बनवण्यासाठी डोंबिवलीत आणले, परंतु त्यांना पगार न दिल्याने ते कारागीर निघून गेले आणि मूर्तीचा लोड तांबडेंवर पडला. त्यामुळे गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर आला असतानाही अनेक मूर्ती रंगरंगोटीविना मंडपात पडून राहिल्या. गणेशभक्तांना ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या पैशात मूर्ती देता येणार नाहीत याची जाणीव झाल्याने मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे हा सोमवारी रात्रीच मूतीं कला केंद्र वाऱ्यावर सोडून पसार झाला.
अनेक गणेशभक्त आदल्या दिवशी सकाळीच मूर्ती आणण्यासाठी या मूर्ती कला केंद्रावर पोहोचले तेव्हा मालकाचा पत्ताच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु तांबडे याचा पत्ता लागला नाही. ही बाब कर्णोपकर्णी डोंबिवलीत पोहोचली आणि तांबडेकडे मूर्ती बुक केलेल्या डोंबिवलीकरांनी या कला केंद्रावर धाव घेतली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. अखेर मूर्ती मिळाली नाही तर बाप्पाचे पूजन कसे करायचे? आणि आयत्या वेळेला मूर्ती मिळणार कुठे? अशी विचारणा करीत गणेशभक्तांनी पोलिसांना पाचारण केले. विष्णूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बुक केलेल्या गणेशभक्तांची पावती तपासून त्यांना दुसरी मूर्ती घेऊन जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे मिळेल ती मूर्ती लोकांना उचलून घरी नेण्याची वेळ आली.





