भव्य मशाल रॅलीने पाचोरा दुमदुमले;वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठाचा एल्गार
पाचोरा-
क्रांती दिनाचे औचित्य साधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाची सध्या मतदार संघात झंझावाती वाटचाल सुरू आहे. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली दररोज पक्षप्रवेशाचे सोहळे पार पडत असून आगामी विधानसभा निवडणूकीत परिवर्तन होणार असल्याचे सर्वत्र जाणवत आहे. नेमके हे चित्र ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी निघालेल्या भव्य मशाल रॅलीतून दिसून आले.
जोरदार जयघोष करत वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅली काढण्यात आली. हातात मशाल घेवून शेकडो पदाधिकारी पाचोऱ्याच्या रस्त्यावरून परिवर्तनाचा नारा बुलंद करत निघाले असतांना त्यांना पाचोरेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मशाल रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
रॅलीला सुरूवात करण्यापुर्वी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही रॅली पक्षाचे जनसंपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्थानक रोड, गांधी चौक असा काढून हुतात्मा चौकात समारोप करण्यात आला. या रॅलीत सहसंपर्क प्रमुख सुनिल पाटील व वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.