परळी वैजनाथ!मलकापुर शिवारात रेल्वेखाली चिरडून एका मेंढपाळासह २२ मेंढ्या, २ गुरांचा मृत्यू..

परळी वैजनाथ-
परळी वैजनाथ येथून जवळच असलेल्या मलकापूर शिवारात मोठी भीषण दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेत 22 मेंढ्या, दोन गुरे व एका मेंढपाळाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परळी व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

परळी शहरातील धनगर गल्ली येथील मधुकर सरवदे व मुंजा मुक्तीराम डोणे रा.उखळी,ह.मु.परळी हे दोघे रेल्वे रुळाने मेंढ्या चारण्यासाठी जात होते. आज रविवार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आपल्या मेंढ्या चारण्यासाठी परळी-हैद्राबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापूर शिवारात समोरुन आलेल्या मालगाडीने मेंढ्या, दोन जनावरांना चिरडले.
दोन्ही बाजुने डोंगर असल्याने बचावासाठी वेळच मिळाला नसल्याने मेंढपाळ मुंजा डोणे हे देखील या दुर्घटनेत मालगाडी खाली सापडून ठार झाले. या घटनेत सरवदे यांच्या 22 मेंढ्या व दोन जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत.