मुंबई विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी
मुंबई-
दि. २८ सप्टेंबर गुरुवार रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.
पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार सुनील तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच
आयुक्त डॉ. चहल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गिरगाव चौपाटीवर आज सायंकाळपासून भाविकांचा जनसागर जमला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मान्यवरांनी यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट घेतली.
देश-विदेशातील पर्यटकांना गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घडविण्यासाठी पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाअंतर्गत उभारलेल्या विशेष ‘गणेश दर्शन’ गॅलरीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भेट दिली. हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या विदेशी पर्यटकांशी संवाद साधला. पोलीस दलाच्या मंडपालाही भेट देऊन त्यांनी तेथून गणेश भक्तांना अभिवादन केले.