पाचोरा तहसील शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी;फॉरेन्सिक टिमने केली बंद हॉलमध्ये चौकशी..

पाचोरा-
पाचोरा तहसील मधील सव्वा कोटीच्या अनुदान घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी फॉरेन्सिक टीम अचानक दाखल झाली व या टीमने बंद हॉलमध्ये अनुदान घोटाळ्यातील चौकशीला सुरवात केली दुपार पासून ते सायंकाळ पर्यंत ही टीम या ठिकाणी थांबून होती.
या बाबत थोडक्यात माहिती अशी की, शेती नावावर नसतांना बनावट दस्तावेज तयार करून 1,20,13,517 हजार रुपये शासकीय रकमेचा अपहार केल्या प्रकरणी पाचोरा तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहायक सह मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी विरोधात तहसीलदार यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून सदरील गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे .

सन 2022 ते सन 2024 पावेतो अमोल सुरेश भोई यांनी स्वतःचा आर्थिक लाभ होण्याचे दृष्टीकोणातुन गणेश हेमंत चव्हाण याचे संगनमताने 2022-2023 आर्थिक वर्षामध्ये 122 व सन 2024-2025 आर्थिक वर्षामध्ये 225 असे एकूण 347 व्यक्तींच्या खात्यावर नैसर्गीक आपत्तीमधिल बाधीत शेती पिकांचे अनुदान देणे पात्र नसतांना, त्यांच्या नावावर शेती नसतांना, आवश्यक कागदपत्रे न घेता बनावट यादया तयार करुन राज्य शासनाची, शेतक-यांची, सामान्य जनतेची, प्रशासनाची, अधिकारी व कर्मचा-यांची फसवणुक करुन अशा व्यक्तींना लाभ दिलेला आहे. तसेच जुन ते ऑक्टोंबर 2022 मधिल पंचनाम्यांच्या अभिलेखात खोटे, बनावट शासकिय दस्तऐवज तयार करुन शासकिय कर्मचा-यांच्या बनावट सह्या करुन लोकप्रतिनीधींच्या बनावट सह्या करुन खोटे दस्तऐवज तयार केले आहे. तसेच तहसिलदार पाचोरा यांचे लॉगीन आय.डी. व पासवर्डचा दुरुपयोग स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासकिय संगणकाचा गैरवापर केला आहे. तसेच लाभार्थी यांचेशी संपर्क साधुन त्यांचेकडुन त्यांचे खात्यावर जमा झालेली रक्कम स्वतः करीता काढुण घेतलेली आहे. तत्कालीन महसुल सहायक अमोल सुरेश भोई यांनी बनावट दस्ताचा वापर करुन एकुण 1,20,13,517/-मात्र (अक्षरी एक कोटी वीस लक्ष तेरा हजार पाचशे सतरा मात्र) इतक्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने अमोल सुरेश भोई, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण व ज्यांनी-ज्यांनी अमोल भोईला आर्थिक अफरातफर करण्यास अनुदानाची शासकिय रक्कम हडप करण्यास मदत केली अशी फिर्याद पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी पाचोरा पोलीसात दाखल केल्याने तत्कालीन महसूल सहायक अमोल सुरेश भोई व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण, पाचोरा या दोघांविरोधात पाचोरा पोलिसात गु.रु.न.428 /2025,भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 316 (4),316(5),318 (4),335,336,(2) (3),340 (2), 3 (5)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्याने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.या अनुदान घोटाळ्यातील चौकशी साठी दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी फॉरेन्सिक टीम अचानक दाखल झाल्याने पाचोरा तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली.या फॉरेन्सिक टीमतर्फे पहिल्या मजल्यावरील बंद हॉल मध्ये अनुदान घोटाळ्याप्रकरणी कॉम्प्युटर्स, हार्डीक्स ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली या बंद हॉलमध्ये दुपारपासून ते सायंकाळ पर्यंत अनुदान घोटाळ्याची तपासणी करण्यात आली. या फॉरेन्सिक टीम कडून तपासणी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अद्याप माहिती मिळू शकली नाही.




