पुणे-
पुणे शहरातील मुळा-मुठा नदीपात्रात खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनमागे वॉटर प्रंट सोसायटीजवळ नदीपात्रात वाहून आलेला तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. अज्ञात आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने १८ ते ३० वयोगटातील या तरुणीचे डोके, हात, पाय धारदार हत्याराने कापून तिचा मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पोलिसांकडून तिची ओळख पटविण्याचे व आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सध्या खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. परंतु पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग काहीसा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होऊ लागल्यानंतर खराडी भागात बांधकाम ठिकाणावर काम करत असलेल्या काही मजुरांना नदीपात्रात एक संशयास्पद मृतदेह दिसून आला. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, अज्ञात इसमाने या तरुणीला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकले असण्याची शक्यता आहे. तिच्या शरीराचे धडापासून शिर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून कोणत्यातरी धारदार हत्याराने कापले असल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी ही रंगाने सावळी असून तिच्या उजव्या काखेच्या खाली काळा व्रण असल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.
याबाबत पोलीस उपायुक्त हिंम्मत जाधव म्हणाले, की धड नसलेला एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळला असून. ससून रुग्णालयात हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांना अधिक माहिती मिळू शकेल. पुणे शहर व पुणे ग्रामीण परिसरात बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती पडताळून पाहिली जात आहे. सदर भागातील सीसीटीव्ही फुटेजची देखील पाहणी करण्यात येत आहे. महिलेची ओळख पटल्यानंतर तपास कामात अधिक गती प्राप्त होईल, असी माहीती दिली.