पि.के.शिंदे विद्यालयाच्या दोन कुस्तीपटुंची “साई” मार्फत
राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड
पाचोरा-
केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग तसेच भारतीय खेल प्राधिकरण (SAI) यांच्यामार्फत संपूर्ण देशभरात “कीर्ती खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट सर्च” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जळगाव येथे झालेल्या निवड चाचणीत पाचोरा येथील कै.पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या दोन कुस्तीपटूंची राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. या निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे युवानेते अमोल भाऊ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय क्रीडा व युवक कल्याण विभाग तसेच भारतीय खेल प्राधिकरण (SAI) यांच्यामार्फत गुणवत्तापूर्ण क्रीडापटूंची निवड देशभरातून केली जात आहे. Kirti khelo India rising talent search या उपक्रमाचा भाग म्हणून दिनांक 30 ऑगस्ट रोजी एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे कुस्ती या खेळाची निवड चाचणी घेण्यात आली. 14 वर्ष आतील निवड चाचणीत पाचोरा येथील कै .पि.के. शिंदे विद्यालयाचा खेळाडू कु. यश गणेश भोसले, इयत्ता 6 वी याची 38 किलो वजनी गटात तर कु. योगिनी किशोर पाटील इयत्ता 9 वी हिची 43 किलो वजनी गटात निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय निवड चाचणीत पात्र ठरलेल्या दोन्ही कुस्तीपटूंना पुणे येथील क्रीडा प्रशिक्षण शिबिरात पुढील मार्गदर्शन मिळणार आहे. याशिवाय या दोन्ही विद्यार्थ्यांना पुढील 8 वर्ष मोफत शिक्षण व प्रशिक्षण कालावधीमध्ये पाच लाख रुपयापर्यंतची क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक जी. व्ही.सोमवंशी, हेमंत टोणपे, आर. आर. आव्हाड, आर. व्हीं. सोनवणे व श्रीमती डी. एस. ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, युवकांचे प्रेरणास्थान भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी दोन्ही खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुणोत, सहसचिव शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक एस. व्ही. गीते, पर्यवेक्षक गजानन सोमवंशी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.