लग्नाचा बनाव रचून ठगणारी एजंट टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश.
चाळीसगाव-
शहरातील चाळीसगाव रोड परिसरात राहणारा तरुण ज्ञानेश्वर रोहीदास चौधरी (वय 32) हा लग्नासाठी मुलीचा शोधात असताना एजंट मोरे याने सुंदर बनावट नवरी मुलीचा फोटो त्याच्या मोबाईलवर पाठविला. सदर मुलगी पसंत आल्याने 20 ऑगस्ट रोजी तरुणासह त्याचे नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल (मध्यप्रदेश) येथे गेले. तेथे त्यांना फोटोमधील बनावट नवरी मुलगी दाखविण्यात आली. तेथे नवरीचे सर्व बनावट नातेवाईक देखील हजर होते. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी एजेंट मोरे हा तरुणाच्या घरी गेला व सांगितले की, सदर मुलीला दुसरे स्थळ आले असून, तुम्हाला सदर मुलीशी लग्न करायचे असेल तर आता ताबडतोब 3 लाख रूपये द्या. त्यानुसार तरुणासह त्याच्या वडीलांनी लग्नासाठी 3 लाख रुपये गोळा करून दिले. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी तरुण व त्याचे नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल, मध्यप्रदेश येथे गेले. तेथुन बिजासनी माता मंदिर, मध्यप्रदेश येथे हिंदू रितीरिवाजा प्रमाणे दोन्ही कुटुंबांच्या समोर त्याचे लग्न लावण्यात आले. लग्न करून वऱ्हाड बनावट नवरी मुलगी व नवरीची आई यांच्यासह घरी परत येत असताना सोनगीर येथे एका हॉटेल मध्ये जेवणासाठी थांबले. याच संधीचा फायदा घेवून बनावट नवरी व तिची आई हे बाथरूमला जाण्याचा बहाणा करून हॉटेलच्या बाहेर पडले व अज्ञात इसमाचे मोटार सायकलवर बसून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाच्या फिर्यादीवरून 25 ऑगस्ट रोजी चाळीसगांव रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अविवाहित तरुणांची होणारी फसवणूक हा ज्वलंत सामाजिक विषय असल्याने या प्रकरणात एसपी श्रीकांत धिवरे यांनी स्वतः लक्ष घातले. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जिवन बोरसे, सहा. पोलीस निरिक्षक यांना सदर टोळीस पकडण्याचे आदेश दिले. सपोनि बोरसे यांनी लागलीच दोन तपास पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. सदरचे आरोपी हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यात लपण्याचे ठिकाण बदलत फिरत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना शिताफिने पकडले. यात सुनिल पदमसिंग चव्हाण (27), रा. दुधखेडा, ता. शहादा जि. नंदुरबार (बनावट नवरी मुलीचा भाऊ), नसीम मुजफ्फर खान पठाण (28), रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा जि. नंदुरबार, (एजंट), भागाबाई बळीराम गवळी (48). रा.
रायसिंगपूरा नंदुरबार (बनावट नवरी मुलीची आई), नादरसिंग उर्फ महाराज मंटूसिंग रावत-पावरा (बनावट नवरी मुलीचा मामा) यांना पोलिसांनी अटक केली. तर एक विधीसंघर्षीत बालिका (बनावट नवरी मुलगी) हीस ताब्यात घेवून रिमांड होम येथे जमा करून या टोळीकडून 25 हजारांची रोकड व एक होंडा कंपनीची मोटार सायकल (एम. एच 39 / ए. एच 4480) जप्त केली. ताब्यात
इतर आरोपींचाही शोध सुरू! पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतल्यानंतर यात इतर आरोपींची नावेही समोर आली आहेत. त्यात साईबाई बादया पावरा, रा. मानमोडया, ता. शहादा जि. नंदुरबार (बनावट आजी), संजय रामा मिल, रा. दुधखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार (बनावट नातेवाईक), जलनसिगं प्रेमसिंग मोरे, रा.नांदया, ता. शहादा, जि. नंदुरबार (एजंट) यांचा समावेश आहे. या आरोपींचा शोधही पोलिसांनी सुरु केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पीएसआय शरद व्ही. लेंडे करीत आहेत. यांनी केली कामगिरी. सदरची कामगिरी एसपी श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जिदन बोरसे, पोउपनि हरीशचंद्र पाटील, पोहेकॉ सुनिल एस. पाथरवट, अविनाश वाघ, संजय धनगर, शोएब बेग, अतिक शेख, पोकों सिराज खाटिक, सारंग शिंदे, सचिन पाटील, विनोद पाठक, मनोद भामरे, संदीप वाघ, पोशि माधुरी हटकर यांनी केली. दरम्यान, अशा पध्दतीने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन सपोनि जीवन बोरसे यांनी केले आहे. बनावट आई, बनावट मामा, बनावट भाऊ. या टोळीला पकडल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान, या कारवाईमुळे ठगबाजी करणाऱ्या टोळींमध्ये धडकी भरणार आहे. तसेच पोलिसांनी पकडलेल्या टोळीने अन्य तरुणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेनेही पुढील तपास करत आहेत.