पाचोरा मतदारसंघात शेतकरी शिवसंवाद यात्रेचा झंझावात
शेतकऱ्यांनी केले पूजन; वैशालीताईंनी दाखविला हिरवा झेंडा
पाचोरा-
तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकरी शिवसंवाद यात्रा काढण्यात येत असून आज या रथाचे पूजन करून हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेशी हितगुज साधण्यासाठी शेतकरी शिवसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त विकासाचे विशाल ध्येय घेऊन वैशालीताई सुर्यवंशी यांनी वाटचाल सुरू केली असून या यात्रेच्या माध्यमातून त्या जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचा गौरवशाली इतिहास आज विस्मरणात गेला असून निव्वळ भ्रष्टाचार व दडपशाहीचे वातावरण आहे. सर्वसामान्यांना अनेक समस्या भेडसावत असून यात शेतकरी तर केंद्र व राज्य शासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे खूप त्रस्त झालेले आहेत. शेतीमालास नसलेला भाव, पीक विम्यातील अडचणी, हमीभाव, विक्री प्रणालीतील त्रुटी, सिंचन, वीज, नुकसान भरपाई, कर्ज पुरवठा, गिरणा नदीचे संवर्धन अशा शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. यासोबत शिक्षण, आरोग्य, व्यापार, उद्योग, बेरोजगारी, महागाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई, महिलांवरील अत्याचार आदी समस्या जैसे थे आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींच्या नाकर्त्ोपणामुळे मानसिंगका मील, नगरदेवळा सूत गिरणी, कजगाव केळी धक्का, कासोदा साखर कारखाना, पाचोरा-जामनेर रेल्वे आदी अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबीत असून या संदर्भात जनतेशी वैशालीताई या यात्रेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या स्वप्नातील भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त सर्वांगीण विकासासाठी शेतकरी शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याला वंदन करून शेतकरी शिवसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पिचर्डे येथील सौ. कमलाबाई आनंदा पाटील व आनंदा श्रावण पाटील तसेच पळासखेडे येत्रील सौ. अनजाबाई ताराचंद भराडी व ताराचंद भराडी या दोन शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. तर वैशालीताई आणि नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांनी तात्यासाहेबांच्या पुतळ्याला वंदन केले. यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून शेतकरी शिवसंवाद यात्रेचा शुभारंभ केला. ही यात्रा संपूर्ण मतदारसंघात फिरणार आहे.
शेतकरी संवाद यात्रेचा पहिला टप्पा ९ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान पाचोरा तालुक्यात राबविण्यात येत असून 1 ते 10 ऑक्टोबरपर्यंत भडगाव तालुक्यात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात नगरदेवळा-बाळद गटात 9 ते 12 सप्टेंबरच्या दरम्यान यात्रा फिरणार असून दिनांक 12 रोजी सकाळी अकरा वाजता नगरदेवळा येथे शेतकरी मेळावा होणार आहे. खडकदेवळा-लोहटार गटात 13 ते 16 तारखेच्या दरम्यान यात्रा फिरणार असून दिनांक 16 रोजी पाचोऱ्यातील श्रीनाथ मंदिरात शेतकरी मेळावा होणार आहे. बांबरूड-कुरंगी गटात 18 ते 21 सप्टेंबरच्या दरम्यान शेतकरी शिवसंवाद यात्रा फिरणार असून या गटातील मेळावा दिनांक 21 रोजी नांद्रा येथे होणार आहे. पिंपळगाव हरेश्वर-शिंदाड गटात दिनांक 23 ते 26 तारखेच्या दरम्यान यात्रा फिरणार असून दिनांक 26 रोजी पिंपळगाव हरेश्वरला मेळावा होणार आहे. तर, वरखेडी गटात 27 रोजी यात्रा फिरणार असून येथे दिनांक 28 रोजी शेतकरी मेळावा होणार आहे. दरम्यान, आजच्या कार्यक्रमाला वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह उध्दव मराठे, शरद पाटील, राजेंद्र देवरे, बालूअण्णा, दीपक पाटील, दादाभाऊ चौधरी, मनोहर चौधरी, अनिल सावंत, गोरखदादा पाटील, रतन परदेशी, जे. के. पाटील, अनिल सावंत, योजनाताई पाटील, मच्छींद्र आबा, संदीप जैन, मनोज चौधरी, अभिषेक खंडेलवाल, आनंदा पाटील, उमेश हटकर, पप्पू राजपूत, पप्पू जाधव, भाऊसाहेब पाटील, ॲड. दीपक पाटील, गफ्फारभाई, खंडू सोनवणे आदी मान्यवरांसह शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.