मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज आता अंगणवाडी सेविकाच भरणार; शासनाचा निर्णय..
मुंबई-
राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका यासह 11 जणांना प्राधिकृत केले होते. पण, आता राज्य सरकारने शुक्रवारी ( दिनांक 6 सप्टेंबर) एका नव्या आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेतील महिलांचे अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. या योजनेला ग्रामीण भागातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत या योजनेमध्ये राज्यात दीड कोटीहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. या योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने नागरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक सीआरपी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र अशा 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. सरकारकडून त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये दिले जात होते.
राज्यभरातील कोट्यवधी महिला या योजनेशी जोडल्या गेल्याने आता, सदर योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या कमी होत आहे. गुरूवारी (दिनांक 5 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता या योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत केलेल्या 11 पैकी अंगणवाडी सेविका वगळता इतरांचे अधिक्रमण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.