आमीषला बळी पडू नका अन् दडपशाहीला घाबरू नका; वैशालीताई सुर्यवंशी,शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद.
पाचोरा-
आगामी निवडणुकीआधी आपल्याला दाखविण्यात येणाऱ्या आमीषाला बळी पडू नका अन् दडपशाहीला न घाबरता तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तनाला कौल द्या ! असे आवाहन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत बोलत होत्या.
शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला तिसऱ्या दिवशी देखील गावोगावी उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला. आज पाचोरा तालुक्यातील घुसर्डी बुद्रक, होळ, सांगवी, वडगाव स्वामीचे, बाळद, नाचणखेडा या गावांमधून ही यात्रा काढण्यात आली. यातील प्रत्येक गावांमधील नागरिकांशी संवाद साधतांना त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. यात घुसर्डी येथील शेतकऱ्यांनी पीक विम्याबाबत तक्रार केली. आमदारांनी कोणताही पाठपुरावा न केल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी रस्त्यावर गाव असून देखील बस थांबत नसल्याने अडचणीत येत असल्याचे गाऱ्हाणे मांडले. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिली. तर आमदारांसह अन्य नेत्यांनी आमीषाचे प्रलोभन अथवा दबाव आणल्यास याला बळी न पडण्याचे आवाहन देखील केले.
होळ येथील गावकऱ्यांनी देखील त्यांच्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने घुसर्डी ते होळ या रस्त्याची झालेली दुर्दशा, परिसरातील रस्त्यांची अपूर्ण कामे, गावातील विठ्ठल-रूक्मीणी मंदिरासाठी निधीची आवश्यकता या बाबींचे विवेचन ग्रामस्थांनी केले. गावात काहीच विकासकामे झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे करण्याची ग्वाही देतांनाच वैशालीताईंनी आपल्याला अनेक ऑफर येऊन देखील मी जनतेच्या सेवेसाठी तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या मार्गावरून निघाली असल्याचे आवर्जून नमूद केले. तर, होळ गावातील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्ह्यात लौकीक मिळवलेल्या जिल्हा परिषद शाळेला देखील वैशालीताईंनी भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. यानंतर सांगवी येथील ग्रामस्थांनी देखील गावात विकासकामांची बोंब असल्याची तक्रार केली. या गावात प्रामुख्याने बेघरांना घरे नसल्याने अनेकांनी तक्रारी केल्या. तर, तरूणांनी गावासाठी स्वागत कमानीची मागणी केली असता आपण हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे वैशालीताई म्हणाल्या.
वडगाव स्वामीचे या गावात यात्रेचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी ग्रामस्थांशी वार्तालाप केला. येथील ग्रामस्थांनी आपण मोठ्या आशेने विद्यमान आमदारांना निवडून दिले असले तरी त्यांनी कोणतीही कामे न केल्यामुळे आम्ही ताईंसोबत राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. बाळद येथे हुतात्मा जवान पोपट कमलाकर पाटील यांच्या स्मृती स्थळाला वंदन करून यात्रा सुरू झाली. येथील नागरिकांनी देखील न झालेल्या कामांचा पाढा वाचला असता वैशालीताईंनी त्यांना कामांबाबत आश्वस्त केले. नाचणखेडा येथे यात्रेचे अतिशय उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. येथे ज्येष्ठांनी वैशालीताईंना भरभरून आशीर्वाद देत आगामी निवडणुकीत त्यांना यश मिळणारच असा आशावाद व्यक्त केला.
आजच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत उध्दव मराठे, ॲड. अभय पाटील, बाळू पाटील, योजना पाटील, अरूण तांबे, हरीभाऊ पाटील, संदीप जैन, सुनील सावंत, सागर देवरे, नामदेव चौधरी, प्रकाश पाटील आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी, विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.