जामनेर पंचायत समितीतील प्रसाधन गृहला कुलूप,कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांची गैरसोय..
जामनेर-
जामनेर पंचायत समितीच्या आवारातील प्रसाधन गृह मागील एका महिन्यापासून बंद असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांना शौचालयासाठी बाहेर जाण्याची वेळ आली आहे. विशेषतः महिलांना, अपंग व्यक्तींना आणि वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समितीतील कामांसाठी आलेल्या नागरिकांची हेळसांड होत आहे, तर दुसरीकडे पंचायत समितीतील अधिकारी मात्र हेच प्रसाधन गृह नियमितपणे वापरतात.
आज संतप्त नागरिकांनी या गंभीर समस्येवर आपला आवाज उठवला. अधिकारी प्रसाधन गृह वापरू शकतात, पण आम्हाला ते वापरू देत नाहीत. आम्ही बाहेरून आलेले नागरिक असू म्हणून आमच्यासाठी सुविधा नाही का? असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.गेल्या काही दिवसांपूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते की प्रसाधन गृहाची दुरवस्था आणि गैरवर्तनाच्या घटनांमुळे ते बंद केले आहे, परंतु ते दोन-तीन दिवसांत पुन्हा सुरू केले जाईल. मात्र, पंधरा दिवस उलटून गेले तरी प्रसाधन गृह अद्यापही बंदच आहे.आज नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या संतापाचे प्रत्यक्ष प्रदर्शन केले. आमच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या जात नाहीत, आम्ही कुठे जायचं? अशी विचारणा करत त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली. नागरिकांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे की जर लवकरात लवकर प्रसाधन गृह खुले करावे अशी मागणी केली आहे. यावर प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.