पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी…
पाचोरा-
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलिस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलिस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पोलिस ठाणे हद्दीत राजकीय पक्षपाती धोरणाने काम करीत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सामाजिक वादविवाद व किरकोळ भांडण प्रकरणी भाजप पदाधिकारी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असताना अनेकदा पोलीस निरीक्षकांकडून अपमानास्पद वागणूक देत त्यांना पोलिस स्थानकातून हाकलून लावण्याचे प्रकार समोर आले आहे.
त्यामुळे भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाचोरा पोलिस स्थानकात सन्मानाची वागणूक मिळावी, पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह त्यांच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालय बदली करावी अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तरी या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप युवा मोर्चातर्फे देण्यात आला आहे.