जर कार्य केले तर रडायची गरज काय ? वैशालीताईंचा टोला,
शेतकरी मेळाव्यात आमदारांच्या दाव्यांची पोलखोल
भडगाव-
”तुम्ही खूप विकास केल्याचा आव आणतात. आणि जर कामे केले असतील तर व्यासपीठावर रडून लोकांना भावनिक करण्याची गरज काय ?”असा सवाल करत वैशालीताई सुर्यवंशी यांनी आमदारांनी केलेल्या कामांच्या दाव्यांची चिरफाड केली.
पथराड आणि कोळगाव येथे शेतकरी शिवसंवाद यात्रा काढण्यात आली. यानंतर गुढे येथील राज मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात प्रारंभी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी अत्याधुनिक पध्दतीत शेती करत उत्पादकता वाढविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून अनेक मुद्यांना स्पर्श केला.त्या म्हणाल्या की, मतदारसंघात कोणतीही कामे झालेली नसून फक्त आभास निर्माण करण्यात आलेला आहे. आमदारांनी ज्या कामांचा दावा केला आहे ती देखील झाली नाहीत. यामुळे कामे केली नसल्यामुळे व्यासपीठावर येऊन अश्रू ढाळत लोकांना भावनाशील करण्याची काहीही गरज नसल्याचे ताईंनी सुनावले. तर याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात विकासाचे व्हिजन मांडत आपण निवडून आल्यानंतर समग्र विकास करणार असल्याचे प्रतिपादन केले. ताई पुढे म्हणाल्या की, विद्यमान आमदार हे दहा वर्षांपासून सत्तेत असले तरी त्यांना बंधारे बांधता आले नाहीत, सिंचनाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. आता मात्र निव्वळ वाऱ्यावरील बाता करून भुलथापा देण्याचे काम करत असल्याची टिका त्यांनी केली. तर आपल्या सासरचे मूळ गाव वढदे असल्यामुळे मी तुमची कन्या आणि सून दोन्ही असल्याने मला निवडणुकीत कौल द्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. के. बी. पाटील, राजेंद्र सोनवणे, उध्दव मराठे, गणेश परदेशी, रमेश बाफना, मनोहर चौधरी, दीपक पाटील, अरूण पाटील, बाळू पाटील, मच्छींद्र पाटील, सतीश पाटील, तुकाराम महाजन, गोरख पाटील, रतन परदेशी, चेतन पाटील, राजू आबा, शाम सर, चेतन पाटील. योजनाताई पाटील, विजय साळुंखे, एकनाथ महाजन, पप्पू पाटील, राजू मोरे, नरेश आबा, मनीषा पाटील, नीता भांडारकर, उषा परदेशी, गायत्री वाघ, माधुरी पाटील, मीरा जैसवाल, सिंधूताई वाघ, मीनाक्षी पाटील, अरूण पाटील आदींची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.